Wed, Jul 17, 2019 07:59होमपेज › Goa › गुळेलीत गव्याच्या हल्ल्यात तरुणी ठार

गुळेलीत गव्याच्या हल्ल्यात तरुणी ठार

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 10 2018 1:01AMवाळपई : प्रतिनिधी

गुळेली पंचायत क्षेत्रातील   शेळ-मेळावली येथील पूजन पुंडलिक मेळेकर  या 25 वर्षीय  तरुणीचा  भावासोबत  दुचाकीवरून जात असताना गुळेलीत गव्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. गव्याच्या हल्ल्यात जीवितहानीची दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

दरम्यान, गव्यांच्या स्थलांतराबाबत लेखी आश्‍वासन   देत नाही, तोपर्यंत पूजन मेळेकरचा मृतदेह ताब्यात न  घेण्याची भूमिका घेऊन   ग्रामस्थांनी  वन खात्याच्या अधिकार्‍यांना घटनास्थळी  सुमारे 8 तास घेराव घातला. स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी मध्यस्थी करून याबाबतचे वनाधिकार्‍यांकडून लेखी आश्‍वासन घेतल्यानंतर दुपारी 3 वाजता ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले .

सविस्तर वृत्त असे की, पूजन पुंडलिक मेळेकर ही तरुणी आपल्या भावासोबत शेळ मेेळावली येथून दुचाकीवरून  गुळेलीकडे येत असताना गावापासून जवळपास दीड कि.मी. अंतरावर गव्याने त्यांच्या दुचाकीवर  अचानक  हल्ला केला. या हल्ल्यात पूजन  जबर जखमी झाली. ही घटना सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी पूजनला तातडीने  वाळपई सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोमेकॉ     इस्पितळाकडे  नेत  असताना वाटेतच तिचे निधन झाले. 

स्थानिकांनी दिलेल्या  माहितीनुसार ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी 108 रुग्णवाहिकेला  बोलावूनही जवळपास अर्धा तास रूग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. त्यामुळे एका खासगी वाहनातून पूजनला वाळपई सामाजिक रुणालयात दाखल करण्यात आले.   

पूजन ही उसगाव येथे नेस्ले कंपनीत पॅकर म्हणून नोकरीस होती.  तिला पहिल्या शिफ्टमध्ये कामाला पोहोचायचे होते, यामुळे ती आपल्या भावासोबत गुळेली येथे येऊन तेथून खासगी बसने कामावर जाणार होती. मात्र, वाटेतच तिच्यावर  काळाने घाला घातल्याने भागात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन गव्यांच्या हैदोसाबद्दल तीव्र  संताप व्यक्त  करून गव्यांचे स्थलांतर करण्याची जोरदार मागणी केली.

..तर तिचे प्राण वाचले असते ः जागृती देवळी 

या अपघातासंदर्भात प्रत्यक्षदर्शी जागृती देवळी यांनी सांगितले की, गव्याच्या हल्ल्यानंतर पूजन मेळेकर ही रस्त्यावर कोसळली होती. गव्याने पहिला हल्‍ला केल्यानंतर ती रस्त्यावर पडली. अशाच अवस्थेत उन्मत्त  गव्याने दुसरा हल्ला केला. यामुळे ती जबर जखमी झाली. सुमारे पाच मिनिटे गवा त्याच ठिकाणी  होता. मात्र, मागून आलेल्या काही ग्रामस्थांना पाहून त्याने पळ काढला. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे मोबाईलची रेंज नसल्याने एका तरुणाने गुळेलीत जाऊन 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला. रुग्णवाहिका वेळेवर न पोचल्याने तिला खासगी वाहनाद्वारे वाळपई सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी जवळपास पाऊणतास ती विव्हळत होती. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती, तर कदाचित तिचे प्राण वाचले असते. 

बसची सुविधा असती तर...

आणखी एक प्रत्यक्षदर्शी सृष्टी देवळी यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून शेळ मेळावली भागातून गुळेली येथे जाण्यासाठी कदंब बसची मागणी करण्यात आली होती; मात्र  निवेदन देऊनही त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने नाईलाजाने लोकांना दुचाकी व अन्य  वाहने पकडून गुळेलीत यावे लागते. सरकारने कदंब बसची मागणी पूर्ण केली असती, तर कदाचित पूजनचे प्राण वाचले असते.  

हिंसक गव्यांना अभयारण्यात पाठवावे : आरोग्यमंत्री राणे

 राज्य सरकारने कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या सरकारशी गव्यांच्या बंदोबस्ताबाबत चर्चा करावी. गरज पडल्यास शेजारील राज्यातून पथक आणून हिंसक गव्यांना अभयारण्यात नेऊन सोडावे, अशी मागणी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केली आहे.