Mon, Mar 18, 2019 19:34होमपेज › Goa › राज्याला वादळी पावसाने झोडपले

राज्याला वादळी पावसाने झोडपले

Published On: May 11 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 1:36AMपणजी : प्रतिनिधी

राज्यभरात गुरुवारी पहाटे विजेचा  कडकडाट अन् वादळी वार्‍यासह सुमारे 4 तास पडलेल्या वळीव पावसामुळे विविध ठिकाणी पडझड होऊन लाखो रुपयांची हानी झाली.  पर्वरीत पहाटे नारळ वेचण्यासाठी घराबाहेर आलेल्या सीताबाई नाईक (वय 80) या वृद्धेचा साकवात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. विविध ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज खंडित झाली, तर मडगावात बसस्थानकाजवळील दिशादर्शक कमान रस्त्यावर कोसळल्याने पणजी-मडगाव मार्गावर पाच तास वाहतुकीचा खोळंबा झाला. राज्यात येत्या 48 तासांत पुन्हा  गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी सांगितले.

राज्यात बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत विजांचा कडकडाट व ढगांचा  गडगडाट सुरूच होता. म्हापसा, मडगाव, वाळपई, डिचोली, जुने गोवे, काणकोण, दाबोळी, केपे   भागात जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली.  तसेच पेडणे, फोंडा, मुरगाव, पणजी येथेही जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यात मध्यरात्री पावसामुळे विविध ठिकाणी वीज खांब उन्मळून पडल्याने काही ठिकाणी पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणांवर पहाटे वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला तर काही ठिकाणी गुरूवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. 

डिचोलीत वाहनांवर झाडे पडून मोठी हानी झाली, तर सासष्टी तालुक्यातील नावेली, शिरोडेत घरांवर झाडे पडून नुकसान झाले. पिसुर्लेत शाळेचे छप्पर उडाले, तर काही ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली. फोंड्यात निरंकाल भागात रस्त्यावर झाड पडून वाहतुकीचा काही काळ बोजवारा उडाला. वीज खांब पडून वीज खंडित होण्याचे प्रकारही घडले.

पणजी वेधशाळेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार बुधवारी रात्री म्हापसा व मडगाव भागात सर्वाधिक प्रत्येकी 2.36 इंच पावसाची नोंद झाली. वाळपई व एला (जुने गोवे) भागात प्रत्येकी 1.57 इंच, काणकोण, दाबोळी व केपे भागात प्रत्येकी 1.18 इंच पावसाची नोंद झाली. फोंडा, पणजी, साखळी व सांगे भागात प्रत्येकी 2 सें. मी. तर पेडणे व मुरगाव येथे 1 सें. मी. इतक्या पावसाची नोंद झाली. 

साहू म्हणाले, दिवसभरात तापमान वाढीमुळे वातावरणातील उष्णतेत वाढ झाल्याने पावसाचे ढग जमा  होत आहेत.  परिणामी विजांचा कडकडाट, वादळी वारे व पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता असून त्यानंतर मात्र वातावरण कोरडे राहिल. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी थंड वारा, विजांची चकमक व गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल. 

अग्निशमन दलाने  दिलेल्या माहितीनुसार मडगाव, जुने गोवे व म्हापसा, डिचोली, फोंडा, वाळपई भागात मोठ्या प्रमाणात झाडांच्या पडझडीचे प्रकार घडले. शिवोली भागात बुधवारी मध्यरात्रीपासून पडलेल्या वादळी पावसामुळे काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्या, काही ठिकाणी वीज खांब पडले. यामुळे परिसरात सलग बारा तास वीज पुरवठा खंडित होता.