Sat, Apr 20, 2019 07:53होमपेज › Goa › ...तर खाणपट्ट्यात येऊ देणार नाही 

...तर खाणपट्ट्यात येऊ देणार नाही 

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMफोंडा ः प्रतिनिधी

 बंद असलेल्या खाणी येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू न झाल्यास  निवडणूक  प्रचारासाठी येणार्‍या उमेदवारांना खाणपट्ट्यात पाय ठेवू देणार नाही ,असा इशारा  खाण अवलंबितांनी रविवारी उसगाव येथे झालेल्या ट्रकमालक संघटना, खाण कामगारांच्या बैठकीत दिला.

 खाण अवलंबितांचे आंदोलन तीव्र करण्यासाठी ट्रक व मशीन मालक, कामगार नेते यांच्यासह  50 सदस्यीय नवी  संयुक्त समिती  स्थापन करण्यात आल्याचे नीलकंठ गावस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना  सांगितले. या बैठकीला कामगार नेते पुती गावकर, संदीप परब, शिवदास माडकर, बालाजी उर्फ विनायक गावस, सुरेश देसाई, किर्लपाल पंचायतीचे उपसरपंच शशिकांत गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

 गावस म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी   भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी  गोव्यात येऊन दोन खासदार निवडून दिल्यास खाणी त्वरित सुरू,असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर जिल्हा पंचायत व विधान सभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी खाणी सुरू करण्याची आश्‍वासने देऊन मते  मिळवली. परंतु खाणअवलंबितांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात सर्व राजकीय नेते असमर्थ ठरल्याचे दिसून  आले.

खाणव्यवसायातून  खाणमालकांनी संपत्ती जमवली, मात्र खाण व्यवसाय बंद पडल्यामुळे  ट्रक , मशीन मालक व कामगार अडचणीत आले आहेत.  खाणी सुरू करून समस्या सोडविण्याची गरज असून त्यासाठी नव्या समितीची स्थापन करण्यात आली आहे,असे नीलकंठ गावस यांनी सांगितले. 

कामगार नेते पुती गावकर यांनी सांगितले,की मंत्री विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर यांनी 31 मे पर्यंत खाणींच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र मे महिना संपत आला तरी सरकारतर्फे काहीच हालचाली झालेल्या दिसून येत नाहीत. त्यासाठी खाणअवलंबितांनी संघटित राहून येत्या 10 दिवसांत प्रत्येक गावात कोपरा बैठक घेण्याची तयारी करावी. त्यानंतर 1 जूनपासून पुढील रणनीती ठरविण्याची गरज आहे.

खाणअवलंबितांनी लढा तीव्र करताना शिस्तबद्धरित्या आंदोलनाची आखणी करून समिती निवडून त्यामार्फत सर्व कृती करण्याची गरज आहे. तरच लढा यशस्वी होऊ शकतो. खाणी सुरु करण्यासाठी गोवा सरकारने कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. मात्र गोवा सरकार जाणूनबुजून योग्य निर्णय घेत नसल्याने प्रश्‍नावर अजून पर्यंत तोडगा निघालेला नसल्याचे पुती गावकर यांनी सांगितले. 
संदीप परब म्हणाले,की खाणअवलंबितांमध्ये एकता नसल्याने सरकार व खाण कंपन्यांनी आजपर्यंत फायदा घेतला. मात्र पुढील संकटावर मात करण्यासाठी सर्वानी संघटित राहून लढा देण्याची गरज आहे.  खाण कंपन्यांच्या  अधिकार्‍यांनी ट्रक मालक व कामगारांत यापूर्वी फूट पाडून स्वतःचा फायदा करून घेतला आहे. 

 बैठकीनंतर  कामगार नेते पुती गावकर, संदीप परब, शिवदास माडकर, बालाजी उर्फ विनायक गावस, सुरेश देसाई, किर्लपाल पंचायतीचे उपसरपंच शशिकांत गावकर  यांच्यासह 50 सदस्यीय नव्या संयुक्त समितीची निवड करण्यात आली.  

सरकारच्या हालचाली सुरू : सुदिन ढवळीकर

 खाणी सुरू करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत, असे  बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.  ट्रक, बार्ज, मशीन मालक ,कामगार संघटनांचा अहवाल तयार करून अ‍ॅटर्नी जनरल वेणू गोपाल यांच्याकडे पाठविला आहे.येत्या 2 ते 3 दिवसात यासंदर्भात सरकारकडून अधिकृतपणे सुतोवाच होईल,असेही ते म्हणाले.