Fri, Nov 16, 2018 17:23होमपेज › Goa › अन्नाची नासाडी रोखणार कोण?

अन्नाची नासाडी रोखणार कोण?

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 8:24PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

नोव्हेंबर महिन्यापासूनच मंगलकार्यांची धामधूम आणि यात्रा मोसमाला सुरुवात झाली आहे. यात्रा आणि मंगलकार्यात जेवणावळींना उधाण येते. मात्र या काळात होणारी  अन्नाची नासाडी ही चिंतेची बाब आहे.  त्यामुळे अन्नाची नासाडी रोखण्यासाठी व्यापक प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. 

पुरातन कालापासून आपल्या देशात भोजन व्यवस्थेला आणि सेवेला महत्त्वाचे स्थान आहे. अन्न- पाण्याविना माणसाचे जीवन अशक्य आहे. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जेवणाला सुरूवात करण्यापूर्वी प्रार्थना केली जाते. जर्मनीसारख्या देशात अन्नाची नासाडी हा गुन्हा मानला जातो. आपल्या देशात गरिबीचे प्रमाण मोठे आहे. अनेकांना एकवेळच्या जेवणासाठी झगडावे लागते. असे असतानाही मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असते.  

शहरात सुमारे अनेक छोटी-मोठी हॉटेल आहेत. यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी खानावळींचा समावेश आहे. मोठ्या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांबाबत नियोजन केले जात असले तरीही अन्य हॉटेल आणि फराळाच्या स्टॉलवर अन्नाची नासाडी मोठ्याप्रमाणात होत असतेे. अनेकवेळा हॉटेल, खानावळींच्या परिसरातील कचराकुंडात मोठ्याप्रमाणात अन्न टाकून देण्यात आलेले दिसून येते.  

सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत लग्नसराईचा हंगाम असतो. याच दरम्यान गावोगावच्या यात्राही भरु लागतात. लग्नसराईच्या काळात मंगलकार्यालय परिसरात फेरफटका मारल्यास मोठ्या प्रमाणात अन्न टाकून देण्यात आलेले दिसून येते. यात्रा भरलेल्या गावांतूनही अन्नाची नासाडी झालेली पाहावयास मिळते.

शहर परिसरात  छोटी-मोठी मंगल कार्यालये आहेत. या मंगल कार्यालयांमधून वर्षभर विविध समारंभ सुरू असतात. समारंभाच्या निमित्ताने जेवणावळी आयोजित केल्या जातात. जमिनीवरील पंक्ती कालबाह्य ठरल्या आहेत. बुफे पद्धत सर्वत्र रुढ झाली आहे. मंगलकार्यालयांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या समारंभामधून जेवणाच्या मेनूलाही मोठी प्रतिष्ठा मिळू लागली आहे. मात्र, यातील बर्‍याच अन्नाची नासाडी होऊ लागलेली दिसत असते. 

विविध समारंभांच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणार्‍या डिनर पार्टीतही होणारी अन्नाची नासाडी सर्वांच्या नजरेत भरत असते. मंगलकार्ये, यात्रा आणि पार्ट्यामध्ये अनेक मान्यवर सहभागी होत असतात. सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचीही भोजनावळींच्या ठिकाणी उपस्थिती असते. मात्र, अन्नाची नासाडी रोखण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाहीत. सामाजिक संघटनांनी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.

स्मशानभूमीतूनही अन्नाची नासाडी 

हिंदू धर्मियांत रक्ष विसर्जनावेळी  मृत व्यक्तीला आवडणारे पदार्थ स्मशानभूमीत नैवेद्य नेऊन ठेवण्याची पद्धत आहे. या प्रकारातून अन्नाची मोठ्याप्रमाणात नासाडी होत असते. सोमवार आणि गुरुवारी स्मशान भूमीतून फेरफटका मारल्यास मोठ्याप्रमाणात अन्नाची नासाडी झाल्याचे आढळून येते.