Sun, Aug 18, 2019 14:41होमपेज › Goa › हेलिकॉप्टर कंपनीच्या आश्‍वासनाचे काय झाले?

हेलिकॉप्टर कंपनीच्या आश्‍वासनाचे काय झाले?

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 10:22PMहोंडा : वार्ताहर

पर्ये मतदारसंघातील होंडा औद्योगिक वसाहतीतील ‘गाल’ (गोवा ऑटो एक्सेसरीज लिमिटेड) कंपनी बंद करून त्याठिकाणी हेलिकॉप्टरचे सुटे भाग तयार करणारी नवीन कंपनी सुरू करण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. परंतु, याला तीन वर्षे उलटून गेली तरी अद्याप त्याठिकाणी दुसरी कंपनी आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे सत्तरीतील बेरोजगार युवकांनी संताप व्यक्त करून नव्या कंपनीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला आहे. 

याठिकाणी सुमारे तीन दशके सुरू असलेल्या ‘गाल’चा प्रकल्प तोट्यात चालतो हे कारण पुढे करून सरकारने 2014 साली या कंपनीत काम करणार्‍या शेकडो कामगारांना  घरी पाठवून सदर प्रकल्प बंद केला होता. त्यामुळे या भागातील बरेच कामगार बेरोजगार झाले होते. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे केंद्रिय संरक्षणमंत्री बनल्यानंतर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात याठिकाणी हेलिकॉप्टरचे सुटे भाग बनवण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते याचे उद्द्याटनही करण्यात आले होते. यावेळी सदर प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करून सत्तरी तालुक्यातील बेरोजगार युवकांना कंपनीत काम मिळणार असल्याची घोषणा माजी संरक्षण मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली होती.

यावेळी सरकारच्या या पुढाकाराचे स्वागत करून सत्तरी तालुक्यातील बेरोजगार युवकांनी आनंद व्यक्त केला होता. पंरतु, सदर प्रकल्पाचे उद्द्याटन करून दोन वर्षे उलटली तरी अद्याप याठिकाणी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. यामुळे या भागातील बेरोजगार युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाणबंदी लागू झाली आहे. खाण बंदीचा फटका पिसूर्ले व होंडा पंचायत क्षेत्राला बसला असला असून या भागात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यामूळे सरकारने  सदर कंपनीचा प्रकल्प लवकर सुरू केल्यास या भागातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळतील.

Tags : Goa, What, happened, helicopter, companies, assurance