Wed, Aug 21, 2019 02:18होमपेज › Goa › हत्यांसाठी शस्त्र प्रशिक्षण चिखलेत

हत्यांसाठी शस्त्र प्रशिक्षण चिखलेत

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:14AMबेळगाव : प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश या चारही विचारवंतांच्या हत्यांसाठी शस्त्र प्रशिक्षण भरत कुरणे याच्या चिखलेजवळच्या शेतात देण्यात आले, असा दावा विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला आहे.

बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यावर बेळगावपासून 40 कि.मी. अंतरावर असलेल्या चिखले या गावात भरत कुरणे या गौरी हत्याकांडातील संशयिताचे रिसॉर्ट होते. हे रिसॉर्ट वन खात्याने पाडल्यानंतर त्या जागेवर उभारलेल्या एका शेडमध्ये चारही विचारवंतांच्या हत्येसाठी संशयितांना पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, असे ‘एसआयटी’चे म्हणणे आहे.

कर्नाटक राज्य सरकारचा कर्मचारी आणि मंगळूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला राजेश बंगेरा याने पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचे मानले जाते. एकूण 22 जणांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रत्येकावर वेगवेगळ्या हत्येची जबाबदारी सोपविण्यात आली. गेल्या काही दिवसांत बेळगावात विशेष पोलिस पथकाने (एसआयटी) केलेल्या तपासातून ही माहिती उघड झाली आहे.भरत कुरणे हा बेळगावचा रहिवासी असून, चिखलेतील त्याचे रिसॉर्ट वन खात्याने अतिक्रमणाच्या कारणाखाली पाडल्यानंतर त्याने बेळगाव-कोल्हापूर महामार्गालगत धाबा सुरू केला. त्या धाब्यातून त्याने गौरी हत्याकांडातील संशयितांना जेवण पुरवल्याचे, तसेच त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था केल्याचे ‘एसआयटी’चे म्हणणे आहे.

प्रशिक्षणावेळी संगीत शस्त्र प्रशिक्षण देताना कुरणेच्या चिखलेतील शेडमध्ये डॉल्बी लावला जात होता, असे ‘एसआयटी’चे म्हणणे आहे. संगीताच्या आवाजामुळे स्थानिकांना गोळीबाराचा आवाज ऐकू जात नव्हता. कुरणे, बंगेरासह एकूण 12 जण गौरी हत्याकांडात ‘एसआयटी’च्या अटकेत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ‘एसआयटी’ने बेळगाव आणि चिखले परिसरात तपास केला. भरत कुरणेला त्याच्या चिखलेतील शेतात, शहरात फिरविण्यात आले. चिखलेसह परिसरातील काही जणांकडून शस्त्र प्रशिक्षणाबाबतची माहिती घेण्यात आली. बंगळूरच्या राजाजीनगर ठाण्याचे पीएसआय श्रीधर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू आहे.

7.65 एम.एम. बोअरचे पिस्तूल चारही हत्यांसाठी देशी बनावटीचे 7.65 एम.एम. बोअरचे पिस्तूल वापरण्यात आले आहे. हे पिस्तूल आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जप्‍त केले आहे.

चारही हत्यांचा सूत्रधार अमोल काळे (मूळ पुणे) असल्याचे मानले जाते. त्याने दिलेल्या सुगाव्याच्या आधारे मुंबईतील नालासोपारा येथे महाराष्ट्र ‘एटीएस’ने तिघांना अटक केली. त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि 12 पिस्तूल यासह काही ऐवज जप्‍त केला. सर्व पिस्तूल गुजरातमधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक लॅबोरेटरी) पाठविण्यात आली असून, त्याचा अहवाल आल्यानंतर आणखी माहिती उपलब्ध होणार आहे.

अमोलकडे सापडलेल्या डायरीतून महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. सर्व माहिती सांकेतिक (कोडवर्ड) शब्दांत असून, तिचा अर्थ लावण्याचे काम (डिकोडिंग) सुरू आहे. त्याच्या डायरीत आतापर्यंत चारही हत्यांमध्ये सहभागी असणार्‍या संशयितांची नावे, घरचा पत्ता, संपर्क क्रमांक अशी विविध माहिती नोंद आहे. 

21 मे रोजी अमोलला दावणगेरीत अटक करण्यात आली. लेखक प्रा. के. एस. भगवान यांच्या हत्येसाठी बेळगावातील एका हॉटेलमध्ये कट रचण्यात आला. यासंबंधी पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी दावणगेरीत बैठक घेण्यात येणार होती. त्यावेळी इतर साथीदारांना अमोल काळेने कळविले होते; पण त्याला अटक झाल्याने इतर संशयित एकमेकांच्या संपर्कात न राहता वेगवेगळ्या ठिकाणी पसार झाले.

गौरी लंकेश हत्येवेळी काळेने मारेकर्‍याला काही सूचना दिल्या होत्या. त्याची माहितीही डायरीत आहे. ‘गोळी झाडताना कुणीही मध्ये आले तरी थांबू नये. मध्ये येणार्‍या सर्वांनाच संपवावे.’ असे डायरीत नमूद असल्याची माहिती उघड झाली आहे.

बेळगावात आणखी दोघांचा शोध

बेळगावात एकूण तीन संशयितांना ‘एसआयटी’ शोधत आहे. त्यापैकी एक असणार्‍या भरत कुरणेला 8 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे; पण अद्यापही त्यांचा सुगावा लागलेला नाही. त्यासाठी एसआयटी रविवारपासून बेळगावात ठाण मांडून आहे.