Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Goa › पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ठिय्या आंदोलन   

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ठिय्या आंदोलन   

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 11:48PMबार्देश  : प्रतिनिधी

काणका-म्हापसा भागात  पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याबद्दल सुदेश किनळेकर, अनिलकुमार नागवेकर, सागर लिंगुडकर यांच्या नेतृत्वाखाली तेथील सुमारे 50 ते 60 ग्रामस्थांनी  म्हापसा पाणी पुरवठा कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा नेऊन  अभियंते बेळगावकर यांना   धारेवर धरले. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू,असा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला.यासंदर्भात ग्रामस्थांनी  अभियंते बेळगावकर यांना निवेदन सादर केले.

गेल्या तीन महिन्यापासून  या भागात पाणीपुरवठा होत नसल्याचा जाब सुदेश किनळेकर, अनिलकुमार नागवेकर, सागर लिंगुडकर    यांनी विचारला असता अभियंते बेळगावकर यांना त्यावर  समाधानकारक उत्तर देता आले नाही. 

सुदेश किनळेकर म्हणाले,की या परिसरात पाणी पुरवठ्याचे काम पाहत असलेले कनिष्ठ अभियंत्यांना पाणी पुरवठ्याविषयी विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देतात. त्यांना  येथील जलवाहिनी कुठून कुठपर्यंत गेली तेही माहीत नाही. या भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने येथील लोकांना टॅँकरद्वारे पाणी मागवावे लागते. दर दोन दिवसांनी एकदा एक टॅँकर आणावा लागत असल्याने लोकांना तो परवडत नाही. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, असेही किनळेकर म्हणाले. 

या मार्चेकर्‍यांना समजावून सांगताना अभियंते बेळगावकर यांनी सांगितले की, पाणी का येत नाही याची पाहणी केली जाईल आणि दररोज दोन तास पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यावर मोर्चेकरी भडकले दोन तास  पाणी सोडल्यास ते  कुणालाही मिळणार नाही,असा दावा करून महिलांनी गोंधळ घातला आणि  दोन तासांऐवजी चार तास पाणीपुरवठा करावा,अशी मागणी केली. बेळगावकर यांनी त्यावर   अभियंते आग्नेल फर्नांडिस यांना घटनास्थळी जाऊन  पाहणी करण्याचे आदेश दिले आणि  संतप्त ग्रामस्थांना  पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करू, असे आश्वासन दिले.