Wed, Jul 17, 2019 20:39होमपेज › Goa › सत्तरीत पाणीटंचाईचे संकट

सत्तरीत पाणीटंचाईचे संकट

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 12:08AMवाळपई : प्रतिनिधी

ओपा प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट होऊ लागल्याने म्हादई नदीचे पाणी गांजे बंधार्‍यातून खांडेपार नदीत सोडण्यात येत असल्याने सत्तरी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

सदर पाणी वळविणे बंद न केल्यास सत्तरी तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात म्हादई नदीचे पाणी गांजे प्रकल्पाच्या माध्यमातून खांडेपार नदीत सोडण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. यामुळे म्हादई नदीतील पाण्याची पातळी हळूहळू कमी होत गेली. दाबोस प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होऊ लागला. परिणामी सत्तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 

गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या म्हादई नदीच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच म्हादई नदीतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सत्तरी तालुक्यातील जवळपास 70 टक्के गावांची तहान भागवणारा दाबोस प्रकल्प अनेक वर्षापासून कार्यान्वित आहे. या पाणीपुरवठा प्रकल्पाला म्हादई नदीच्या पात्रातून पाण्याचा पुरवठा होत आहे. गेल्या वर्षांपासून येथील यंत्रणा व्यवस्थित चालत होती. मात्र, गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून म्हादई नदीच्या पाण्याची पातळीत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या आठवड्यामध्येही पाण्याची पातळी बर्‍याच प्रमाणात घटल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या प्रयत्नाने दाबोस पाणी प्रकल्प उभारण्यात आला होता. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सदर प्रकल्पाची क्षमता वाढवून पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी खास योगदान दिले होते. सध्या दाबोस पाणी शुद्धीकरण पाणी प्रकल्प 35 एमएलडी क्षमतेचा असल्याने बहुतांश गावांमधील पाणी समस्या दूर झालेली आहे. काही गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने तसेच दाबोस पाणी प्रकल्पातून सदर गावांना पाण्याचा पुरवठा करणे शक्य नसल्याने वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या प्रयत्नांनी वेगवेळ्या ठिकाणी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. दाबोस प्रकल्पाच्या माध्यमातून सत्तरी तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवली जात आहे. 

गेल्या आठवड्यात म्हादई नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्याचा परिणाम दाबोस प्रकल्पाच्या यंत्रणेवर झालेला आहे.  यामुळे पाणी पुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांची धावपळ उडाली आहे.  याबाबत वाळपईचे पाणी पुरवठा कार्यालयाचे साहायक अभियंता एकनाथ पास्ते यांना विचारले असता, त्यांनी पाण्याची पातळी कमी होत असल्याचे मान्य केले. म्हादई नदीतील पाणीसाठा  कमी झाल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारने सध्या गांजे बंधार्‍यातील पाणी खांडेपार नदीच्या पात्रात सोडण्यास सुरूवात केल्याने गांजे बंधार्‍यातील पाण्याचा साठा बर्‍याच प्रमाणात कमी झाला आहे.गांजे बंधार्‍यात 300 अश्‍वशक्तीचे 3 मोटर्स बसवून म्हादई नदीचे पाणी खांडेपार नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दरम्यान, दक्षिण गोव्यात पाणीपुरवठा करणार्‍या ओपा प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने गांजे बंधार्‍यातून खांडेपार नदीत पाणी सोडले जात आहे. म्हादईचे पाणी खांडेपार नदीत सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका सत्तरी तालुक्यातील लोकांना बसण्याची शक्यता आहे. 

जलस्रोत खात्याने काही वर्षांपूर्वी म्हादई नदीच्या पात्रावर गांजे याठिकाणी सर्वात मोठा बंधारा बांधाला. यामध्ये लाखो लीटर पाण्याचा साठा होत असतो. तसेच गांजे बंधारा ते खांडेपार नदी दरम्यान जलवाहिनी टाकून गांजे बंधार्‍यातील पाणी खांडेपार नदीत सोडण्यात येत आहे.