Thu, Aug 22, 2019 12:43होमपेज › Goa › पाण्याचे नियोजन आवश्यक

पाण्याचे नियोजन आवश्यक

Published On: May 29 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 10:55PMपर्वरी : वार्ताहर

पाणी हे जीवन असल्याने त्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. उपलब्ध असलेले पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पिळर्ण पंचायतीचे सरपंच अजय गोवेकर यांनी केले.सावळे पिळर्ण येथील पुरातन झरीचे सुशोभीकरण करून ती लोकांसाठी खुली करण्यात आली.पिळर्ण पंचायतीचे सरपंच अजय गोवेकर यांनी विधिवत पूजा करून ही झर लोकांसाठी खुली केली.यावेळी जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक, पंचायत सदस्य संदीप बांदोडकर, करण गोवेकर, ब्रेंडा डिसोझा, अरुण नागवेकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोवेकर पुढे म्हणाले की, झर सुशोभित करून तिला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले आहे. गोवेकर म्हणाले की, एकेकाळी स्वच्छ पाण्याने तुडुंब भरलेल्या या झरीतील जलस्तर घटल्यामुळे पाणी अगदी तळाशी पोहोचले होेते. जुन्या झरीतील पाण्यात साचलेला कचरा काढून त्या झरीची साफसफाई करण्यात यावी, अशी विनंती गावकर्‍यांतर्फे अनेकदा करण्यात आली; परंतु प्रशासनाच्या नेहमीच्या कारभाराचा फटका गावकर्‍यांनाही बसला. वारंवार विनंती करूनही प्रशासनाने ग्रामस्थांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर पंचायतीने या झरीची स्वच्छता करून सौंदर्यीकरण करण्याचे ठरवले.

आता स्थानिक लोक या तळ्यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी करू शकतात. लोकांनी या तळ्यातील पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच कोणतीच बेशिस्त कृती करू नये. येथे गौतम बुद्धांची मूर्ती लावली आहे.त्याचेही पावित्र्य लोकांनी जपावे, असे आवाहन सरपंच अजय गोवेकर यांनी यावेळी केले. या तळ्यामुळे गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होत नाही. तळ्यात मुबलक प्रमाणात पाणी साठा असल्याने स्थलांतरित पक्षांचे थवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे अनेक पक्षी तज्ज्ञ या ठिकाणाला भेट देतात. लोकांनी या तळ्याची आणि झरीची योग्य देखभाल करावी, असे असे जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक यांनी सांगितले.  सदर झरीच्या सुशोभिकरणाचे  काम सहा लाख रुपये खर्चून केले आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे काम झाले आहे. तळ्यात बारमाही पाणीसाठा असल्याने गावातील लोकांना  कधीच पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही, असेही ते म्हणाले.बिल्डर लॉबीच्या घशात हे तळे जाण्याची शक्यता होती.