होमपेज › Goa › पणजीत ‘व्हिवा कार्निव्हल’चा जल्लोष

पणजीत ‘व्हिवा कार्निव्हल’चा जल्लोष

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 11 2018 12:03AMपणजी : प्रतिनिधी

‘व्हिवा कार्निव्हल’च्या घोषात मीरामार ते दोनापावल मार्गावर शनिवारी संध्याकाळी कार्निव्हल मिरवणूक जल्लोषात पार पडली.  किंग  मोमो ब्रुनो आझारेदो यांनी समस्त  गोमंतकीय जनतेला ‘खा, प्या आणि मजा करा’ च्या दिलेल्या संदेशाने चार दिवसांच्या कार्निव्हल महोत्सवाला प्रारंभ झाला.  

व्हिवा कार्निव्हलच्या घोषात शनिवारी संध्याकाळी 4 वाजता मीरामार किनार्‍यावर कार्निव्हल मिरवणुकीला प्रारंभ झाला. ती संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत चालली. विविध विषयांवर तयार केलेल्या चित्ररथांचा मिरवणुकीत सहभाग होता. स्थानिकांसह देशविदेशातील पर्यटकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती.

कार्निव्हल मिरवणुकीचे उद्घाटन  पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल, महापौेर सुरेंद्र फुर्तादो व अन्य मान्यवर उपस्थित होेते. 

मुलगी वाचवा, वन्य प्राण्यांचे  संवर्धन, स्वच्छ गोवा, असे संदेश देणार्‍या चित्ररथांनी देशी-विदेशी पर्यटकांचे  लक्ष  वेधले. मांडो नृत्य, नांगरणी करणारे शेतकरी, असे काही भव्य चित्ररथ गोव्याची कृषी परंपरा दर्शविणारे होते. 

कार्निव्हलमध्ये चित्ररथांची भव्य मिरवणूक पाहण्यास रंगीबेरंगी कपडे परिधान करून स्थानिकांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांनी दुपारी 2  वाजल्यापासूनच गर्दी केली होती. यात बच्चे मंडळी व युवक-युवतींचा  सहभाग मोठा होता.

गोव्याच्या पारंपरिक संस्कृतीचेही विविध  चित्ररथांव्दारे  दर्शन घडले.  यात गोव्याचे  पारंपरिक व्यवसायांची माहिती देणारे चित्ररथ, गोव्यातील फेस्त परंपरा, पर्यावरणचे जतन करणे, पाव बनवण्याची प्रक्रिया, अशा  चित्ररथांचा समावेश होता. मिरवणुकीवेळी लोकनृत्ये, अन्य नृत्य सादरीकरणाला प्रेक्षकांनी दाद दिली.  मीरामार येथील विज्ञान केंद्र ते करंजाळे येथील  हॉटेल स्विम सीपर्यंत कार्निव्हल मिरवणूक  चालली. 

चित्ररथांबरोबरच  विविध कार्टून्स किंग काँग-चिंपांझी, डोनाल्ड डक, पायरेटस् बोट  तसेच   पारंपरिक  वेशभूषा  परिधान केलेल्या कलाकारांनीही  लोकांचे लक्ष वेधले. विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी मुखवटे, पताका, बॅनर्सनी पणजीला सजविण्यात आले होते. रस्त्यांवर ठिकठिकाणी सजावट करण्यात आली होती. कार्निव्हलच्या पार्श्‍वभूमीवर पणजीत पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.