Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Goa › विमल गुप्ता लाचप्रकरणी अहवाल देण्याचा लोकायुक्‍तांचा निर्देश

विमल गुप्ता लाचप्रकरणी अहवाल देण्याचा लोकायुक्‍तांचा निर्देश

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:33AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोवा पोलिस खात्याचे माजी  पोलिस उपमहानिरीक्षक आयपीएस अधिकारी विमल आनंद गुप्‍ता यांनी  कनिष्ठ अधिकार्‍याची खात्याअंतर्गत  सुरू असलेल्या चौकशीची फाईल बंद करण्यासाठी लाच  मागितल्या प्रकरणाची लोकायुक्‍तांनी स्वेच्छा दखल घेतली आहे. त्यानुसार  लोकायुक्‍तांनी गृहखात्याला या संदर्भात 29 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 

याप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक देवयानी आंबेकर व एका कॉन्स्टेबलला यापूर्वीच सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर लाच मागितल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिस उपमहानिरीक्षक गुप्‍ता यांची गोव्यातून बदली करण्यात आली आहे.

एका प्रकरणात महिला उपनिरीक्षक आंबेकर हिला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तर सदर कॉन्स्टेबल हा अधिकार्‍यांपर्यंत पैसे पोचवण्याचे काम करीत असल्याने त्यालाही सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या दोघांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. मात्र, आंबेकर हिची  खात्याअंतर्गत चौकशी सुरू असल्याने या प्रकरणाची फाईल बंद करण्यासाठी गुप्‍ता यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महिला उपनिरीक्षक आंबेकर व सदर कॉन्स्टेबल यांना डिसेंबर महिन्यात  पुन्हा निलंबित करण्यात आले आहे.