Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Goa › त्रिमंत्री समितीकडे राज्य कारभार

त्रिमंत्री समितीकडे राज्य कारभार

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 06 2018 1:03AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी राज्याचा प्रशासकीय कारभार त्यांच्या अनुपस्थितीत सुरळीत चालावा,  यासाठी भाजपचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा, मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे  विजय सरदेसाई या मंत्र्यांची त्रिसदस्यीय सल्लागार समिती गठण केली आहे, अशी  माहिती कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी सोमवारी  दिली. 

मुख्यमंत्रिपदाचा ताबा पर्रीकर यांनी कुणाकडेच दिलेला नाही. आपण नेमके किती काळ गोव्याबाहेर असू, ते मुख्यमंत्र्यांनी  सांगितलेले नाही. प्रथम आपण मुंबईला तपासणीसाठी जात असल्याची कल्पना त्यांनी भाजपच्या गाभा समितीला दिली आहे. मुंबईतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण गरज भासल्यास परदेशात जाणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे काही मंत्र्यांनी सांगितले . 

गोवा फॉरवर्डचे नेते तथा कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांना  सांगितले की, पर्रीकर यांनी मंत्रिमंडळ सल्लागार समिती स्थापन केली असून ही समिती प्रशासकीय कारभाराबाबत निर्णय घेईल. मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याला 50 लाख रुपयांपर्यंतचा निधी विकासकामांसाठी वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. यावरील रकमेबाबतचा निर्णय सदर सल्लागार समिती घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपलब्धतेच्या कालावधीत प्रशासकीय कामकाजांचा खोळंबा होऊ नये, म्हणून सदर निर्णय घेण्यात आला आहे. 

सोमवारी सकाळी कृषी मंत्री विजय सरदेसाई आणि पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, महसूल मंत्री रोहन खंवटे, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, उपसभापती मायकल लोबो, आमदार चर्चिल आलेमाव तसेच अन्य आमदारांशीही चर्चा केली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयीन सूत्रांनी दिली.

पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा,  प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्याशी महत्वाच्या विषयावर चर्चा केली. शिक्षण, वित्त, गृह  तसेच अन्य महत्वाच्या खात्यांतील अधिकार्‍यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. विविध पक्षांतील आमदारांनाही ते भेटले. महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवकांच्या  स्वतंत्ररित्या घेतलेल्या भेटीत पर्रीकर यांनी आगामी महापौर निवडणुकीत भाजप गटाची रणनिती निश्‍चित केली. प्रदेश भाजपच्या  गाभा समितीसह माजी संघटनमंत्री सतीश धोंड, पक्षातील महत्वाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकार्‍यांनाही मुख्यमंत्री भेटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.