Mon, May 27, 2019 01:34होमपेज › Goa › गोव्याच्या किनारी भागात दक्षतेचे आदेश

गोव्याच्या किनारी भागात दक्षतेचे आदेश

Published On: Apr 08 2018 2:11AM | Last Updated: Apr 08 2018 2:11AM
पणजी : प्रतिनिधी

मच्छीमार बोटीद्वारे दहशतवादी  दाखल होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केल्याने गोवा सरकारने राज्यातील सर्व कॅसिनो, बार्ज, जलक्रीडा व्यावसायिक, बोटी व  राज्यातील किनारी भागात दक्ष राहण्याचा आदेश जारी केला आहे. कॅप्टन ऑफ पोर्टस् खात्याने या संबंधीचा आदेश जारी केला आहे, अशी माहिती बंदर कप्तानमंत्री जयेश साळगावकर यांनी दिली.

मंत्री साळगावकर म्हणाले की, पाकिस्तानकडून काही दिवसांपूर्वी  भारतातील मच्छीमार बोट जप्त करुन त्यावरील कामगारांना  ताब्यात घेण्यात आले होते. 2 एप्रिल रोजी पाकिस्तानने सदर बोट सोडून दिली असून ती भारताकडे परत येत आहे. मात्र, या बोटीव्दारे दहशतवादी येण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर हा दक्षता आदेश जारी करण्यात आला आहे. आदेश केवळ गोव्यासाठी नसून मुंबई व गुजरात किनारपट्टीवरदेखील खबरदारी घ्यायला हवी. कॅप्टन ऑफ पोर्ट खात्याने  दक्षतेचा आदेश शुक्रवार दि. 6 एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा जारी केला आहे. 

साळगावकर म्हणाले की, जिल्हा तटरक्षक दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून कराची येथे भारताच्या ताब्यात घेण्यात आलेल्या मच्छीमार बोटीतून दहशतवादी किनारी मार्गे प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी ते हल्ला करु शकतात, असा इशारा त्यांनी दिलेला असून  त्यानुसार  दक्षता आदेश  देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व कॅसिनो, बार्ज, क्रुज बोटी, जलक्रीडा व्यावसायिक, बोटींसह किनारी भागात दक्षता राखण्यास सांगितले आहे.
 

Tags : Goa, Vigilance orders