Sun, Jun 16, 2019 02:12होमपेज › Goa › विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार

विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार

Published On: May 29 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 11:11PMफोंडा : प्रतिनिधी 

भाजपकडे अन्य पर्यायी व्यवस्था नसल्याने गोव्यात मुख्यमंत्री नसताना सरकार चालविण्यात येते हे  गोमंतकियांचे दुर्भाग्य आहे.  राजकीय क्षेत्रात मोठा बदल घडविण्यासाठी गोवा सुरक्षा मंच येणारी विधानसभा निवडणूकीत 35-36 जागा स्वतंत्रपणे लढविणार आहे. गोवा सुरक्षा मंचाचे धोरण तळागाळापर्यंत पोहचवून मंचाचे वटवृक्षात रूपांतर  करण्यास कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोवा सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर यांनी केले.  

फोंडा येथे रविवारी गोवा सुरक्षा मंचातर्फे आयोजित केलेल्या  कार्यकर्ता मेळाव्यात   ते  बोलत होते.  व्यासपीठावर अ‍ॅड. स्वाती केरकर, गोविंद देव, उत्कर्ष बोरकर, आत्माराम गावकर व किरण नाईक उपस्थित होते. भाजपने दिलेल्या प्रत्येक आश्वासनांवर यू टर्न घेतला आहे.  भाजप, काँग्रेस व मगोने फक्त लोकांची दिशाभूल केली असून गोवा सुरक्षा मंचने मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना केली आहे, असेही वेलिंगकर म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असून येणारी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्यासाठी आजपासून  तयारी सुरु केली आहे. सुमारे 35-36 जागांवर निवडणूक लढविली जाणार आहे.  येत्या 15 दिवसात 25 मतदार संघात समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.   गरज पडल्यास शिवसेनेशी युती करण्याचा विचार करू, असेही  वेलिंगकर म्हणाले. प्रत्येक मतदार संघात आजपासून सदस्य नोंदणी करण्यात सुरुवात केली असून 22 जुलै पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल.  गेल्या विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंचाने मगो व शिवसेनेशी युती केली होती. मात्र युतीचा जाहीरनामा  करण्या ऐवजी मगोपक्षाने शेवटच्या दिवसात आपला स्वतःचा जाहीरनामा तयार करून कॅसिनोला विरोध व मातृभाषेला समर्थन देण्याचे दोन विषय मागे घेतले. यावरून भाऊसाहेबांच्या काळातला मगो पक्ष व सध्याचा मगो पक्ष यात फरक असल्याचे दिसून येते, असे   वेलिंगकर म्हणाले. 

अ‍ॅड. स्वाती केरकर म्हणाल्या,  विद्यमान सरकारने अजून   खाण धोरण जाहीर न केल्याने खाण अवलंबितांना बंदीची झळ सोसावी लागत आहे. कॅसिनो व म्हादई सारखे प्रश्न गोवा सुरक्षा मंचाने घेऊन जागृती केली आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शिरोडा मतदार संघाचे अध्यक्ष उत्कर्ष बोरकर यांच्या हस्ते सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.