Mon, Mar 25, 2019 09:18होमपेज › Goa › उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोवा भेटीवर

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोवा भेटीवर

Published On: Dec 17 2017 1:42AM | Last Updated: Dec 17 2017 1:27AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे शनिवारी दाबोळी विमानतळावर सकाळी आगमन झाले. राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  आणि सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी विमानतळावर जाऊन उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. 

मागील दोन दिवसांत अनेक केंद्रीय मंत्र्यांनी गोव्याला धावती भेट दिली असून संरक्षण मंत्री निर्मला सितारामन रविवारी (दि.17) गोव्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बांबोळी येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये  इंडिया आयडियाज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त परिषदेस मार्गदर्शन करण्यासाठी देशातील राजकीय व विविध क्षेत्रातील दिग्गज परिषदेस उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही इंडिया आयडियाजमध्ये भाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.  शनिवारी परिषदेतभाग घेतल्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती  व्यंकय्या नायडू दिल्लीस रवाना झाले.

काही नेत्यांचा मुक्काम अजून गोव्यात आहे तर काहींंनी परिषदेस मार्गदर्शन करून तात्काळ पुढील प्रवासास रवाना झाले. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनीही गोव्याला भेट दिली.

दरम्यान, डिसेंबर महिना असल्याने व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्य महोत्सव नुकताच पार पडला असून राज्यात सेरेंडिपिटी कला महोत्सवची धूम सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त हजारो पर्यटकही सध्या गोव्यात दाखल झाले असून समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी झाली आहे.