होमपेज › Goa › गाडल्या गेलेल्या कामगाराचा शोध सुरूच 

गाडल्या गेलेल्या कामगाराचा शोध सुरूच 

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 12:18AM

बुकमार्क करा

फोंडा : वार्ताहर

कोडली येथील वेदान्ता खाण कंपनीत डंप कोसळून झालेल्या दुर्घटनेत गाडल्या गेलेल्या मनोज नाईक कळंगुटकर या कामगाराच्या शोधकार्याला रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. तपास पथकाला संध्याकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. 

खाण कंपनीकडे जाणार्‍या सर्व प्रवेशद्वारांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून घटनास्थळी जाण्यापासून पत्रकार आणि ग्रामस्थांना रोखण्यात आले. डंप कोसळून मनोज नाईक कळंगुटकरसह अन्य परप्रांतीय कामगार गाडले गेले असावेत, असा संशय परिसरातील ग्रामस्थ व्यक्‍त करीत आहेत. खांडेपारहून मनोज नाईक कळंगुटकर यांचे कुटुंबीय रविवारी सकाळी गेटसमोर हजर झाले. 

माती बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर

फोंडा : वार्ताहर

फक्‍त 10 जणांनाच गेटमधून प्रवेश देऊन कार्यालयाजवळ बसविण्यात आले. घटना घडली त्याठिकाणी धारबांदोड्याचे मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर सकाळपासून ठाण मांडून होते. सध्या यंत्राद्वारे माती बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केल्याचे दिसून येते. तीस टनाचा रिपर अंदाजे दीडशे मीटर खाली कोसळला असून उलटलेली जीप रविवारी सकाळी तेथून काढण्यात आली.
वेदांता कंपनीच्या अधिकारी संगीता चक्रवर्ती यांनी सदर घटनेची माहिती पत्रकारांना वेळोवेळी गेटसमोर येऊन दिली जाणार असल्याचे सांगितले. 

मनोज नाईक कळंगुटकर यांचे चुलत बंधू दिगंबर नाईक कळंगुटकर यांच्यासह गावातील काहीजण सकाळपासून गेटसमोर ठाण मांडून होते. कंपनीचे अधिकारी ग्रामस्थांना गेटमधून प्रवेश देत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

पत्रकारांना प्रवेशबंदी, अन् अधिकार्‍यांचा राग

दुर्घटनेची माहिती मिळविण्यासाठी गेलेल्या सावर्डे व फोंड्यातील पत्रकारांना  गेटसमोर रोखण्यात आले. आमदार दीपक पाऊसकर यांनी सदर पत्रकारांना आपल्या वाहनातून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना वाहनातून खाली उतरून आमदारांना गेटमधून प्रवेश दिला.  संतप्त पत्रकार दुपारी दोन वाजता  तेथून माघारी परतले. मात्र संतापलेल्या पत्रकारांनी शेवटी पोलिसांना व कंपनीच्या अधिकार्‍यांना चकमा  देऊन दुर्घटनेजवळील छायाचित्रीकरण लपून केले. सदर माहिती मिळताच कंपनीच्या अधिकार्‍यांचा राग अनावर झाला.

खनिज वाहतुकीवर प्रश्‍नचिन्ह

डंप कोसळून दुर्घटना घडल्याने सोमवारी खनिज वाहतूक सुरु होणार की नाही याकडे ट्रकमालकांचे लक्ष लागून राहीले आहे, तसेच दुर्घटनेमुळे खाण बंद होण्याची शक्यता काही ग्रामस्थांनी  व्यक्त केली.