Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Goa › लोकांनी सहकार्य केल्यास विकास शक्य 

लोकांनी सहकार्य केल्यास विकास शक्य 

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 10:38PM

बुकमार्क करा
वास्को : प्रतिनिधी

नव्या कामांचा पूर्ण अभ्यास नसताना विरोध करण्यात कोणताही अर्थ नाही. कुठलाही विषय योग्यरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केला  पाहिजे. विनाकारण विरोध करू नये, लोकांनी सहकार्य केल्यास गोव्याचा विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. मुरगाव  मतदारसंघातील सडा येथे 13 कोटी 39 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या जलतरण तलावाच्या पायाभरणी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर, आमदार मिलिंद नाईक, साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दीपक पाऊसकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर, उपनगराध्यक्ष शशिकांत परब, भाजप मुरगाव मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर व नगरसेवक उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की विकासकामे सुरू असताना त्याला विरोध करणे ही एक प्रथाच झाली आहे. परंतु अभ्यास न करता सरकारविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवर नियंत्रण आल्यामुळे सरकारची प्रशंसा करायला कोणीच पुढे येत नाही. परंतु, कोळशामुळे प्रदूषणाचा बाऊ करून पर्रीकर परत  जा म्हणायला अनेकजण तयार होतात. कोळसा वाहतुकीवर नियंत्रण आल्यामुळे मुरगाव पोर्ट ट्रस्टला सध्या 90 कोटी रुपये नुकसान झाले  आहे. कामगारांच्या वेतनाचा गंभीर प्रश्‍न तयार झालेला आहे. त्यामुळे एम.पी.टी. चालूच  ठेवण्यासाठी केवळ कोळशाच्या व्यवसायावर विसंबून न राहता इतर व्यवसायाचा विचार करावा   लागणार आहे.

राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून 15 हजार कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. 70   हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. तर 22 हजार कोटी रुपयांची कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, असे पर्रीकर म्हणाले. क्रीडामंत्री आजगावकर म्हणाले, की   मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत प्रत्येक प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच यंदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास गोवा सरकार तयार आहे.  आमदार दीपक पाऊसकर यांचेही भाषण झाले.  प्रसाद प्रभू गावकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय सातार्डेकर यांनी आभार मानले.