Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Goa › वास्को नामकरण शताब्दी सोहळ्यास ‘गोसुमं’चा विरोध

वास्को नामकरण शताब्दी सोहळ्यास ‘गोसुमं’चा विरोध

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 10 2018 12:56AMपणजी : प्रतिनिधी

वास्को शहराच्या  नामकरणाला 100   वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने  नामकरण सोहळा साजरा करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.  गोवा सुरक्षा मंचचा या सोहळ्याला कडाडून विरोध असेल. वास्कोतील स्थानिकांनी या विरोधात समिती स्थापन करावी  आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असेल, असे प्रदेशाध्यक्ष आत्माराम गावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गावकर म्हणाले, की 1917  साली पोर्तुगिजांनी  मुरगावचे वास्को - द - गामा असे नामांतर केले. या निमित्ताने भाजपचे आमदार कार्लूस आल्मेदा या नामांतरकरणाची 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारी कार्यक्रम सरकारी खर्चाने करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

ज्या स्वतंत्र्यसैनिकांची गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी हाल सहन केले व वेळेप्रसंगी प्राणांची आहुती दिली त्यांचा हा अपमान आहे.  वास्को-  द -गामा   गोव्यातील शहराला असणे आणि  नाव गोव्याला दिले हे मुक्तीनंतरही हे नाव प्रचलित असणे अधिक लांच्छनास्पद आहे.   मुरगाव येथील स्थानिक राष्ट्रप्रेमींनी या सोहळ्याविरोधात समिती स्थापन करावी. गोसुमंचे सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत असतील, असे गावकर म्हणाले.  

वास्को शहराचे नाव बदलून मुरगाव, टी.बी.कुन्हा किंवा अन्य गोमंतकीय महापुरुषाचे नाव द्यावे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि  नगरपालिकावर भाजप सत्तेत असल्याने त्यांना नामकरण करण्यात अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी  सांगितले. 

1997 मध्ये वास्को द गामाच्या आगमनाला 500 वर्षे पूर्ण झाल्याचा कार्यक्रम काँग्रेसच्या कार्यकाळात आयोजित करण्याचा प्रयत्न झाला होता. तो कार्यक्रम गोव्यातील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उधळून लावला होता. चिनने सुध्दा वास्को द गामाची पंचशताब्दी ‘हॉल ऑफ शेम’ म्हणून साजरी केली होती, असा इतिहास गावकर यांनी सांगितले.