Sat, Jul 20, 2019 13:03होमपेज › Goa › चिखलीत वायू गळतीने घबराट

चिखलीत वायू गळतीने घबराट

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 12:51AMवास्को : प्रतिनिधी

मुरगाव बंदरातून झुआरीनगर येथील झुआरी खतनिर्मिती कंपनीकडे जाणारा टँकर चिखली साग मैदानासमोर शुक्रवारी पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास कलंडून त्यातील अमोनिया वायूची गळती लागल्यामुळे जवळपास एक कि.मी. परिसरातील रहिवाशांना श्‍वास गुदमरण्यासारख्या गंभीर प्रसंगाला समारे जावे लागले. सुमारे पाच तासांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात सरकारी यंत्रणेला यश आले तरी नऊ तासांनी सर्व व्यवहार सुरळीत झाले.

मिळालेल्या माहितीनुसार मुरगाव बंदरातील अमोनिया टाकीतील 15 टन वायू घेऊन टँकर झुआरीनगर येथील झुआरी अ‍ॅग्रो केमिकल्स या खतनिर्मिती कंपनीकडे जात होता. मध्यरात्री 2.45 वा. भरधाव वेगाने जाणार्‍या टँकरवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उजव्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडक देऊन नंतर डाव्या बाजूला असलेल्या राज भंडारे यांच्या बंगल्यासमोर कलंडला.  यावेळी आतील वायूला  गळती लागल्याने रसायन रस्त्यावर विखरून  त्यातून वायू     

सर्वत्र पसरू लागला.

वायू गळतीमुळे जवळपास राहणार्‍या नागरिकांना गुदमरल्यासारखे वाटू लागल्यामुळे लगेच त्यांनी धावपळ सुरू केली. सर्वप्रथम अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आल्यानंतर अग्निशामन दलाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. लगेच वास्को पोलिसांना पाचारण करुन गोव्याच्या इतर भागातील बंब मागविण्यात आले. गोवा अग्निशमन एमपीटी, शिपयार्ड, नौदल, झुआरी कंपनी मिळून एकूण 20 बंब घटनास्थळी दाखल झाले. 

मामलेदार कचेरीतील अमरेश नावाच्या कर्मचार्‍याने प्रसंगावधान राखून जवळच्या इमारतीमधील लोकांना तोंडावर ओलसर कपडा ठेवून तेथून जाण्यास सांगितले. त्यामुळे सुमारे 300 कुटुंबियांनी स्वतःच्या वाहनांतून इतर ठिकाणी धाव घेतली. इतर लोकांना दरवाजे व खिडक्या बंद करुन आतमध्ये राहण्यास सांगितले. सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत खिडक्या व दरवाजे बंद तसेच वीज पुरवठा खंडीत राहिल्यामुळे कित्येक जणांना गुरदमरून आतमध्ये रहावे लागले.

ज्या ठिकाणी टँकर कलंडला त्याच ठिकाणी असलेल्या बंगल्यातील एका ज्येष्ठ महिलेला श्‍वास घेताना त्रास होऊ लागल्यामुळे तिला प्रथम चिखली येथील सरकारी रुग्णालय व तेथून नंतर खासगी इस्पितळात हलविण्यात आले. सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली. सुमारे पाच तासांपर्यंत टँकरमधील रसायन गळती चालूच होती. पाच तासांनी परिस्थिती नियंत्रणात आल्याने क्रेनच्या सहाय्याने टँकर उचलण्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु टँकर बाजूला उभा केल्यानंतर पुन्हा गळतीला सुरुवात झाली. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर चिखली जंक्शन ते दाबोळी विमानतळापर्यंत बंद ठेवलेला मुख्य मार्ग दुपारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

दरम्यान, वायुगळतीनंतर इतर ठिकाणी गेलेले नागरीक माघारी परतले. सदर प्रकार घडल्यानंतर सुमारे एक कि.मी. पर्यंत नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. दुपारपर्यंत सर्वत्र वायुगळतीचा वास येत होता. विद्या मंदिर व नौदल हायस्कूल काही तासांनी बंद करण्यात आले. वास्को पोलिसांनी टँकर चालक दादासाब चौधरी (वय 26) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दक्षिण गोव्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडीस, मुरगावचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, पोलिस अधीक्षक अरविंद गावस व दिवराज गोवेकर,  अधीक्षक सुनिता सावंत, मामलेदार सतीश प्रभू तसेच इतर पोलिस अधिकारी पहाटे पासून घटनास्थळी ठाण मांडून होते. झुआरी कंपनीचे अधिकारी व इतर कर्मचारीसुद्धा घटनास्थळी उपस्थित होते.