Wed, May 22, 2019 23:02होमपेज › Goa › छ. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

छ. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:14AMवाळपई : प्रतिनिधी

गेल्या जवळपास एक वर्षापासून वाळपईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल सुरू असलेला पेच सोडवण्यासाठी वाळपई पालिकेने हातवडा नाक्यावरील पुतळा गुरुवारी पहाटे 5 वाजता हटवला. पालिकेच्या या कारवाईबाबत शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्‍त होत असून, हा पुतळा तेथेच बसवावा, या मागणीसाठी शिवप्रेमींनी वाळपई नगरपालिकेला 48 तासांची मुदत दिली आहे. पुतळा पूर्ववत त्याच जागी न बसवल्यास उद्भवणार्‍या परिणामांना नगरपालिका जबाबदार राहील, असे यावेळी शिवप्रेमींनी सांगितले.

दरम्यान, हा पुतळा बेकायदेशीर असल्याने कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी सिंथिया मिस्किता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

याबाबतची माहिती अशी की, गेल्या एका वर्षापूर्वी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींनी वाळपई वन विश्रामगृहासमोरील नाक्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. सदर पुतळा हटवण्यासाठी  पालिकेकडून आधीही प्रयत्न झाले होते. वाळपईच्या मुख्याधिकारी श्रीमती सिंथिया मिस्किता यांनी बुधवार दि.28 फेब्रुवारी रोजी सदर पुतळा हटविण्याचा आदेश दिला व त्याची अंमलबजावणी  गुरुवारी पहाटे 5.30वा. करण्यात आली.

सत्तरी मामलेदारांच्या उपस्थितीत झालेल्या कारवाईवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस  बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.   कारवाईची माहिती मिळताच काही शिवप्रेमींनी  वाळपई पोलिस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायंगणकर यांची भेट घेऊन पालिकेचा तीव्र शब्दात निषेध केला. शिवप्रेमी संघटनेचे विश्वराज सावंत, गौरेश गावस, पंकज मराठे, रोशन देसाई, विजय नाईक, हनुमंत परब, शांताबाई मणेरकर आदींनी वाळपई नगरपालिकेत धडक देऊन मुख्याधिकारी सिंथिया मिस्किता यांना, पुतळा का हटवला, असा जाब विचारला.

विश्‍वराज सावंत म्हणाले की, सदर कारवाईमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून सदर कारवाई करण्यापूर्वी शिवप्रेमींना विश्वासात घेणे जरुरीचे होते. त्यावर मुख्याधिकारी सिंथिया मिस्किता यांनी सांगितले की, सदर पुतळा हटविण्याचा अधिकार नगरपालिकेच्या प्रशासनाचा असून यात कोणालाही विश्वासात घेण्याची गरज नाही, ही कायदेशीर कारवाई  आहे.

सदर पुतळ्याला वाळपई नगरपालिकेची परवानगी नसल्याने कारवाई करण्यात आली आहे.   पालिकेने येथील छ. शिवाजी महाराज पालिका उद्यानात शिवरायांचा  अश्वारूढ पुतळा बसवण्याला परवानगी दिली असून पालिका उद्यानात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवपुतळ्याचे लोकार्पणही झाले आहे. यामुळे सदर विनापरवाना  पुतळा पालिकेने हटविला. या कारवाईमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचे कारण नसून छत्रपती शिवरायांबद्दल आदराची भावना आहे, असेही त्या  म्हणाल्या.

उद्या ‘वाळपई बंद’ची हाक 

वाळपई नगरपालिकेने हातवडा नाक्यावरील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्‍त केला असून, कारवाईच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 3) ‘वाळपई बंद’ची हाक दिली आहे. 
वेरूळ देवस्थान मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी संध्याकाळी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बंद यशस्वी करण्यासाठी शिवप्रेमी, तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी, देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी व सामाजिक संघटनांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. यशवंत गावस होते. शिवप्रेमी संघटनेचे अध्यक्ष विश्‍वनाथ सावंत, गौरेश गावस, हनुमंत परब, पंकज बर्वे यांची उपस्थिती होती. नगरपालिकेच्या कारवाईबाबत तीव्र संताप व्यक्‍त करून मुख्याधिकारी सिंथिया मिस्किता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत वाळपई पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांना निवेदन देण्यात आले.