Fri, Jul 19, 2019 01:08होमपेज › Goa › वाजपेयींचा अस्थिकलश गोव्यात 

वाजपेयींचा अस्थिकलश गोव्यात 

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:25AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि  भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश घेऊन दाबोळी विमानतळावर बुधवारी संध्याकाळी 6 वाजता दाखल झाले. त्यानंतर पणजीपर्यंत वाटेत अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अस्थींचे दर्शन घेतले. 

पणजीतील भाजप मुख्यालय परिसरातील मंडपात या अस्थी ठेवण्यात आल्या असून शुक्रवारी मांडवी व झुआरी नदीत या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे. वाजपेयी यांच्या अस्थी देशातील 97 नद्यांमध्ये विसर्जित करण्याचा केंद्रीय भाजप मंडळाने निर्णय घेतला आहे. या अस्थी नेण्यासाठी सर्व राज्यांतील भाजप प्रदेशाध्यक्ष बुधवारी दिल्लीत दाखल झाले होते. गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून अस्थी ताब्यात घेतल्या. मुंबईला मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासोबत आले. बुधवारी संध्याकाळी ते राज्यात दाखल झाले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक व खासदार नरेंद्र सावईकर त्यांच्यासोबत होते.

दाबोळी विमानतळावर पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासहीत अनेक भाजप कार्यकर्त्यांनी अस्थी दर्शनासाठी गर्दी केली होती. या अस्थी एका पांढर्‍या रंगाच्या वाहनात ठेवून दाबोळी विमानतळाबाहेर आणण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासहित सर्वजण या वाहनासोबत काही अंतर चालत आले.

दाबोळी विमानतळावरून अस्थी सांकवाळ येथील शांतादूर्गा मंदिराजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. त्यानंतर पिलार जंक्शन, पणजी चार खांब, नेवगीनगर, मळा, संगम लॉज आदी ठिकाणी थांबत भाजप मुख्यालयाच्या खाली खास उभारण्यात आलेल्या मंडपात रात्री 8.40 वाजता आणण्यात आल्या. मंडपात आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी अस्थिचे दोन कलश एका उंच जागेवर ठेवले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक हजर होते. 

दक्षिण आणि उत्तर गोव्यात भाजपतर्फे गुरूवार व शुक्रवार असे दोन दिवस वाजपेयी यांच्या अस्थींच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (24 रोजी) सायंकाळी सव्वा पाच वाजता  पणजीतील कॅप्टन ऑफ पोर्ट जेटीकडे मांडवी नदीत अस्थी विसजर्नाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता कुठ्ठाळी फेरी धक्क्याकडून फेरीबोटीतून   भाजपा खासदार सावईकर तसेच अन्य आमदारांच्या उपस्थितीत झुआरी नदीत अस्थी विसर्जित केल्या जाणार आहेत.