होमपेज › Goa › वाजपेयींच्या अस्थिकलशाची दक्षिण गोव्यात दर्शन यात्रा

वाजपेयींच्या अस्थिकलशाची दक्षिण गोव्यात दर्शन यात्रा

Published On: Aug 24 2018 12:42AM | Last Updated: Aug 23 2018 11:18PMमडगाव : प्रतिनिधी 

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश लोकांना दर्शनासाठी गुरूवारी दक्षिण गोव्यात फिरवण्यात आला. केपे येथे सकाळी 11 वाजता अस्थिकलश दर्शनासाठी आणण्यात आला. या वाहनाबरोबर दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर होते. मोठ्या संख्येने लोकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन शोक व्यक्त केला. 

कुंकळी येथील कै. शाणू देसाई यांच्या स्मारकाकडे सकाळी 10.30 वाजता अस्थिकलश ठेवण्यात आला होता. 11 वाजेपर्यंत केपे जुना बाजार येथे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी केपेचे नगराध्यक्ष राहुल पेरेरा, केपे भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश वेळीप, केपे भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, फातोर्डाचे माजी आमदार दामू नायक, व्ही फॉर केपेचे योगेश कुंकळकर, संदीप फळदेसाई, प्रकाश फळदेसाई, फातर्पाचे माजी  सरपंच सेंजिल डिकॉस्ता व अन्य उपस्थित होते. शेकडो लोकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थीही उपस्थित होते. 

दरम्यान, दुपारी 12:30 वाजता  सांगे बसस्थानकाजवळ कलश ठेवण्यात आला. त्यानंतर 1.30  वाजता कुडचडे येथे कलशाचे वाहन रवाना झाले व 4 वाजता तिस्क येथे पोहोचले. 5.00 ते 6.00 या वेळेत शिरोडा बाजारात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. संध्याकाळी 6:30 वाजता फोंडा येथे दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांच्या कार्यालयाकडे वाहन आले. भाजपचे कार्यकर्ते व अन्य नागरिक उपस्थित होते. फोंडा येथे कलश सुमारे दीड तास ठेवल्यावर त्यानंतर रात्री उशिरा  फातोर्डा येथील भाजप कार्यालयात हा अस्थिकलश ठेवण्यात आला. 

शुक्रवारी (दि.24) सकाळी 8:30 ते 9:30 या दरम्यान फातोर्डा येथील बोलशे सर्कल येथे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून 10 वाजता रावणफोंड येथे, नंतर 11 वाजता मडगाव लोहिया मैदानावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
दरम्यान, उत्तर गोव्यातही विविध  ठिकाणी अस्थिकलशाचे लोकांनी दर्शन घेतले.