Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Goa › खाणपट्ट्यात पायाभूत सुविधांसाठी खनिज निधीचा वापर : पाऊसकर

खाणपट्ट्यात पायाभूत सुविधांसाठी खनिज निधीचा वापर : पाऊसकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

जिल्हा खनिज निधीतील सुमारे 188 कोटी रुपयांपैकी काही निधीचा वापर खाणपट्ट्यातील गावात पाणी व वीज पुरवठा, मलनिस्सारण आदी पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रकल्पांसाठी वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निधीत सुमारे 188 कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर यांनी दिली. 

खाण व भूगर्भ खात्याच्या पणजीतील कार्यालयात उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा खनिज निधी समित्यांची संयुक्‍त बैठक नुकतीच पार पडली. उत्तर गोवा समितीचे अध्यक्ष सुभाष मळीक, दक्षिण गोवा समितीचे अध्यक्ष तथा आमदार नीलेश काब्राल व अन्य समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. फाऊंडेशनने याआधीच निधीतील काही रक्कम  दक्षिण गोव्यातील गुड्डेमळ ते कापशे या पहिल्या टप्प्यातील मायनिंग कॉरीडॉरच्या उभारणीसाठी वापरण्यास मंजुरी दिली असून हे काम गोवा साधन सुविधा विकास महामंडळातर्फे येत्या दोन महिन्यांत सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीबद्दल अधिक माहिती देताना महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर म्हणाले की, जिल्हा खनिज निधी अर्थात मिनरल फाऊंडेशनच्या उत्तर गोवा समितीकडे 104 कोटी तर दक्षिण गोवा समितीकडे सुमारे 84 कोटी असे एकूण 188 कोटी रूपये जमा झाले आहेत. फाऊंडेशनच्या बैठकीत निधीतील काही रक्कम खाण पट्ट्यातील  गावांतील लोकांसाठी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, विद्यार्थ्यांसाठी बस वाहतूक, मलनिस्सारण प्रकल्प आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली. खाणबंदीमुळे खाणपट्ट्यातील जनतेला फार त्रास सहन करावा लागत असून त्यांना सरकारतर्फे या निधीतून मदत मिळणार आहे. 

प्रलंबित मायनिंग कॉरिडॉरबद्दल सांगताना पाऊसकर म्हणाले की, महामंडळातर्फे सदर प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन महिन्यांत सुरू करणार आहोत. 

 

Tags ; Panaji, Panaji news, mining, mineral, funds, Deepak Pawaskar,


  •