Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Goa › पर्यटक सुरक्षेसाठी ‘एरियल सर्व्हेलन्स’चा वापर

पर्यटक सुरक्षेसाठी ‘एरियल सर्व्हेलन्स’चा वापर

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 25 2018 12:09AMपणजी: प्रतिनिधी

गोव्याला भेट देणार्‍या  देशी विदेशी पर्यटकांच्या  सुरक्षेसाठी गोवा  पोलिसांकडून   आधुनिक एरियल सर्व्हेलन्सचा वापर करण्यात आला. या पध्दतीचा  वापर करणारे  गोवा पोलिस  खाते हे देशातील  पहिले पोलिस खाते ठरले आहे,अशी माहिती गोवा पोलिस सूत्रांनी दिली.

गोवा हे पर्यटकांच्या पसंतीचे स्थळ असल्याने  येथे येणार्‍या पर्यटकांच्या  संख्येत दिवसेंदिवस  वाढ होत आहे. त्यामुळे  गोव्यात येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेे गोवा पोलिसांकडून  आधुनिक एरियल सर्व्हेलन्सचा वापर केला जात आहे. 

या  एरियल सर्व्हेलन्सचा वापर यशस्वीपणे  नुकत्याच पार पडलेल्या  72 टाईमआऊट  संगीत रजनी व नववर्ष काळात  करण्यात आला. नववर्ष काळात गोव्यातील  वागातोर, बागा, कांदोळी व  कळंगुट या केवळ चार किनार्‍यांवरच 2 लाख पर्यटकांनी  भेट  दिली होती. किनार्‍यांना भेट देणार्‍या लोकांच्या सुरक्षेवर  देखरेख ठेवण्यासाठी  आधुनिक  कॅमेरा असलेल्या ड्रोनचा वापर करण्यात आला. तर रात्रीच्या वेळी   विशेष थर्मल  सेन्सिंग कॅमेरे वापरण्यात आले होते. 

गर्दीच्या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना  घडू नये,याची दक्षता  तसेच लोकांची सुरक्षा हा या आधुनिक एरियल सर्व्हेलन्स प्रणालीचा प्राथमिक उद्देश होता.  भविष्यात देखील गोवा पोलिसांकडून या प्रणालीचा वापर  पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन वेळोवेळी केला जाणार आहे.   गुन्ह्यांच्या तपासासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे  मत गोवा पोलिस खात्याने व्यक्‍त केले आहे.  आधुनिक एरियल सर्व्हेलन्स  ही प्रणाली बंगळूरूस्थित  आयआयओ  टेक्नोलॉजी प्रा.लि.ने  संस्थापक तथा  मुख्य कार्यकारी अधिकारी सनी शर्मा यांच्या  मार्गदर्शनाखाली  डीजेआय व गोवा पोलिसांच्या  दहशतवाद विरोधी पथकाच्या  मदतीने तयार  केली आहे.