Mon, Aug 19, 2019 00:41होमपेज › Goa › सरकारी संकेतस्थळे अद्ययावत करा

सरकारी संकेतस्थळे अद्ययावत करा

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:55PMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांच्या संकेतस्थळांवर नजर ठेवून ती अपडेट करण्याचे आदेश ‘गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड’ला (जीईएल) दिले आहेत. ‘जीईएल’ राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाशी समन्वय साधणार असून वेळोवेळी माहिती अपडेट करणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

राज्य सरकारच्या प्रत्येक खात्याचे संकेतस्थळ आहे, तसेच सरकारचे स्वतंत्र एकत्रित संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर मंत्रिमंडळ, आमदार, सरकारी अधिकारी, विधानसभा, विविध सरकारी कायदे, नियमावली, तसेच सिटिझन चार्टर, ई-सेवा आदींच्या माहितीचा समावेश आहे. या संकेतस्थळांवरील माहिती अनेकदा जुनीच असते. वेळोवेळी ती अद्ययावत केली जात नाही. सरकारी खात्यांमध्ये दैनंदिन तत्त्वावर परिपत्रके, अधिसूचना आदेश काढले जातात. प्रत्येक सरकारी खात्याने वेळोवेळी त्यांची परिपत्रके तसेच अन्य आदेश, अधिसूचना संकेतस्थळावर अपलोड करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत.  

अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जातात, त्याची माहिती किमान महिनाभराच्या कालावधीत तरी संकेतस्थळावर यायला हवी. माहिती अपडेट होणे गरजेचे आहे; परंतु ती अपडेट केली जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता स्वतंत्र पथक तयार करण्यात येणार असून हे पथक प्रत्येक संकेतस्थळाचा आढावा घेणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सरकारच्या विविध खात्यांतील संकेतस्थळे गेल्यावर्षी एकाचवेळी ‘हॅक’ झाली होती. त्यावर खास सुरक्षेचे सॉफ्टवेअर बसवण्यात आल्यानंतर हे प्रकार बंद झाले होते. याबाबत अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून सर्वच खात्यांची संकेतस्थळे अपडेट करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

कला अकादमीऐवजी जपानी संकेतस्थळ

हल्लीच राज्यातील कला अकादमीची माहिती शोधण्यासाठी सरकारी संकेतस्थळाला भेट दिली असता तिथे जपानी संकेतस्थळ उघडते आणि आरोग्यविषयक माहिती उपलब्ध होत असल्याचे आढळून आले.