होमपेज › Goa › विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका थेट पद्धतीने घ्याव्यात

शिवसेना विद्यार्थी विभागाचे राज्यपाल यांना निवेदन

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 02 2018 12:50AMपणजी : प्रतिनिधी 

गोवा राज्य शिवसेनेच्या विद्यार्थी विभागाने राज्यपालांची भेट घेऊन विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका थेट पध्दतीने घेण्यात याव्यात, असे निवेदन सादर केल्याची माहिती शिवसेनेचे विद्यार्थी विभाग प्रभारी चेतन पेडणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले, की सदर निवडणुका शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जुलै - ऑगस्ट महिन्यात घेतल्या जातात. थेट निवडणुकीत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून मतदान होत असल्याने दबाव किंवा अपहरणांसारखा बेकायदेशीर प्रकार होत नाही. गेल्या वर्षी झालेल्या विद्यापीठ निवडणुकीत शिवसेना विद्यार्थी विभागाने भाग घेतला होता. 

परंतु निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करत मुख्यमंत्र्यांनी सर्व विद्यापीठ प्रतिनिधिंची गोवा विधानसभा संकुलात बैठक घेऊन त्यांच्यावर दबाव आणला होता. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना विद्यार्थी विभागाने गोवा प्रमुख जितेश कामत यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांच्या विद्यार्थी विभागांची बैठक आयोजित करून निवडणुकीवर बहिष्कार घालून निवडणूक रद्द करण्याची मागणी करत विद्यापीठावर मोर्चा नेण्यात आला होता. 

विद्यापीठ निवडणुकीत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी सध्याची निवडणूक पद्धत बदलून दिल्ली विद्यापीठ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सारख्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांनी केले.  सचिव (युवा विभाग प्रभारी), अमोल प्रभुगावकर, चेतन पेडणेकर व इतर विद्यार्थी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.