Tue, Mar 19, 2019 03:36होमपेज › Goa › पणजी महापौरपदासाठी मडकईकर निश्‍चित

पणजी महापौरपदासाठी मडकईकर निश्‍चित

Published On: Mar 01 2018 1:42AM | Last Updated: Mar 01 2018 12:17AMपणजी : प्रतिनिधी

एकमेव महानगरपालिका असलेल्या पणजी मनपाच्या  मार्च महिन्यात होणार्‍या  महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात  बाबूश मोन्सेरात गटाची मिरामार येथील गास्पर डायस हॉलमध्ये बुधवारी  बैठक पार पडली. या बैठकीत महापौरपदासाठी  उदय मडकईकर  यांचे नाव  गटातर्फे उमेदवार म्हणून निश्‍चित करण्यात आले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय   बाबूश मोन्सेरात  घेणार आहेत, अशी माहिती  सूत्रांनी दिली.

दरम्यान,  मनपा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 17 मार्च रोजी होणार असून याबाबतची अधिसूचना  7 मार्च रोजी जारी केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

मनपाच्या विद्यमान  महापौर सुरेंद्र फुर्तादो  व उपमहापौर लता पारेख  यांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपुष्टात येणार आहे.  त्यामुळे  त्यापूर्वी या दोन्ही पदांसाठी निवडणुका  होणे आवश्यक आहे. मोन्सेरात गटाकडून उपमहापौर पदासाठी अस्मिता केरकर यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे.

मनपाच्या  महापौरपदाच्या आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मोन्सेरात गटाच्या  15  नगरसेवकांच्या  या बैठकीत मडकईकर यांच्या नावाला एकमताने संमती देण्यात आली. मडकईकर यांच्या नावाचा प्रस्ताव मोन्सेरात यांच्याकडे  मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. सध्या मनपात मोन्सेरात गटाचेच महापौर व उपमहापौर  आहेत. मोन्सेरात गटाकडून महापौर व उपमहापौर पदासाठीची नावे  जवळपास निश्‍चित झाली असतानाच विरोधी भाजप गटाकडून  या दोन्ही पदांसाठी नावे समोर आलेली नाहीत.