Sat, Aug 24, 2019 23:28होमपेज › Goa › अपघातात दोन युवक ठार

अपघातात दोन युवक ठार

Published On: Jan 19 2018 1:50AM | Last Updated: Jan 18 2018 11:27PMपणजी : प्रतिनिधी

दोनापावला येथे गुरुवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास  झालेल्या दुचाकी अपघातात  रिफ वेल्हो (वय 16) व  सोहेल शेख (19, दोघेही रा.करंजाळे) हे  दोन युवक जागीच ठार झाले तर  दुचाकी चालक जेस्बन सिक्‍वेरा (19, रा.करंजाळे ) हा गंभीर जखमी झाला.  

जेस्बन, रिफ व सोहेल हे तिघेही एकाच दुचाकीवरुन प्रवास करीत होते. पणजी पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, दुचाकी चालक जेस्बन सिक्‍वेरा हा आपली (जीए 07 जे 0482) यामाहा  एसझेड-एक्स ही  दुचाकी घेऊन रिफ वेल्हो  व  सोहेल शेख या आपल्या दोन्ही मित्रांना   सोबत घेऊन दोनापावला येथील  एनआयओ सर्कलकडे निघाला होता. जेस्बन हा हेल्मेट परिधान न करताच  बेशिस्तपणे तसेच बेदरकारपणे दुचाकी चालवत होता.

दोनापावला येथील ब्रिटिश सिमेंट्रीनजीक पोहोचताच तेथे  असलेल्या साईन बोर्डला दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचालक जेस्बन तसेच त्याच्या मागे बसलेले रिफ व सोहेल हे तिघेही रस्त्यावर आदळले. यात  रिफ  व  सोहेल  हे दोन्ही युवक जागीच ठार झाले तर जेस्बन  हा गंभीर जखमी झाला. या अपघात प्रकरणी  पणजी पोलिसांनी दुचाकीचालक  जेस्बन याच्याविरोधात बेशिस्तपणे वाहन हाकल्याप्रकरणी  गुन्हा नोंदवला आहे.  पणजी पोलिस उपनिरीक्षक राजाराम बागकर तपास अधिकारी म्हणून काम पहात आहेत.