Sun, Jul 21, 2019 16:22
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › सांगे सरकारी उच्च माध्यमिकला दोनच शिक्षक

सांगे सरकारी उच्च माध्यमिकला दोनच शिक्षक

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 12:32AMमडगाव : विशाल नाईक

सांगे येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय केवळ दोघा पूर्णवेळ शिक्षकांवर चालत आहे. या विद्यालयात सतरा शिक्षक व्याख्यान पद्धतीवर नेमले आहेत. मात्र, शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊनही कृषी, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांसाठी घेतलेले शिक्षक कामावर रुजू न झाल्याने लांबचा प्रवास करून येणार्‍या विद्यार्थ्यांवर केवळ हजेरी लावून पायपीट करण्याची वेळ आली आहे.

गेली अनेक वर्षे हे उच्च माध्यमिक विद्यालय अशाच अवस्थेत चालत आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे. पण, खात्याने व्याख्यान पद्धतीवर नेमलेले शिक्षक अजून रुजू झालेले नाहीत. सविस्तर वृत्ताप्रमाणे गेली अनेक वर्षे सांगेतील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय केवळ व्याख्यान पद्धतीवर नेमलेल्या शिक्षकांवर चालत आहे. या विषयी प्राचार्य आनंद कुडाळकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कला शाखेतील एक शिक्षिका आणि एक शारीरिक शिक्षक असे दोघेच शिक्षक पूर्णवेळ आहेत. तर नॉन टिचिंग स्टाफमधील आपण स्वतः ग्रेड एकचे अधिकारी आणि एक कॉम्प्यूटर शिक्षिका पूर्णवेळ तत्वावर आहे. उर्वरित सतरा शिक्षक एलबीटी म्हणजे व्याख्यान तत्वावर शिकवत आहेत.

सांगे तालुक्यातील हे एकमेव उच्च माध्यमिक विद्यालय आहे. सांगे गाव, नेत्रावळी, वाडे वसाहत, वालंकीणी वसाहत, उगे, भाटी, नेतूर्ली, मळकर्णे, कोटार्ली, काले अशा विविध भागांतील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती आणि कमी अंतर या कारणाने  इयत्ता अकरावीसाठी सांगे उच्च माध्यमिक विद्यालयला पसंती देतात. विशेष म्हणजे या उच्च माध्यमिक विद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखांबरोबर कृषी क्षेत्राशी निगडित असलेली कृषी पदवी शाखा चालवली जाते. जिथे अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांकडून विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश दिला जात नाही, अशी स्थिती असताना सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांची अवस्था सुधारण्यासाठी शिक्षण खाते काहीच करत नसल्याचे समोर आले आहे.

विज्ञान शाखा अर्धवेळ शिक्षकांवर

एरव्ही खासगी उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळविणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जाते. सांगे उच्च माध्यमिक विद्यालयात चालविण्यात येणार्‍या विज्ञान शाखेत एकही पूर्णवेळ शिक्षक नाही. त्यामुळे पालक आपल्या मुलांना या ठिकाणी पाठवण्यास तयार नाहीत. दक्षिण गोव्यात अनुदानित शिक्षण संस्थांकडून विज्ञान शाखेसाठी 80 ते 85 टक्के कटऑफ टक्केवारीची अट ठेवण्यात आलेली आहे. प्रवेश प्रक्रियादेखील थांबविण्यात आलेली आहे, तिथे अर्धवेळ शिक्षकांकडून चालविण्यात येणार्‍या सांगे उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेत अजून तीस विद्यार्थी घेण्याची गरज आहे.मुख्याध्यापक आनंद कुडाळकर यांनी सांगितले की, विद्यालयात 30 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून अजून 30 विद्यार्थी वर्गात सामावू शकतात.

कला शाखेच्या अकरावी इयत्तेसाठी दोन वर्ग आहेत. आत्तापर्यंत एकूण शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे, तर अजून 20 विद्यार्थी घेण्याची आमची तयारी आहे. वाणिज्य शाखेत 30 जणांनी प्रवेश घेतला असून आणखी 20 जणांना प्रवेश दिला जाऊ शकतो. कृषी शाखेत 40 विद्यार्थी आहेत तरी आणखी दहा विद्यार्थी घेतले जाऊ शकतात. कुडाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कला शाखेत शिकवणारी एकमेव  शिक्षिका पूर्णवेळ तत्वावर आहे. व्याख्यान पद्धतीवर शिकवण्यासाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यात एकूण 80 उमेदवारांनी भाग घेतला होता. आवश्यक अशा शिक्षकांची आम्ही निवड केली असून लवकरच ते कामावर रुजू होणार आहेत. व्याख्यान पद्धतीवर केवळ एका वर्षासाठी शिक्षक घेतले जातात.