Sun, May 31, 2020 00:21होमपेज › Goa › राज्यात दोन नवे रुग्ण, नऊजण कोरोनामुक्त

राज्यात दोन नवे रुग्ण, नऊजण कोरोनामुक्त

Last Updated: May 22 2020 11:28PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात शुक्रवारी  आणखी दोन नवे कोरोना‘पॉझिटिव्ह’ रुग्ण सापडले असून हे दोघेही रस्तामार्गे महाराष्ट्रातून शुक्रवारी राज्यात दाखल झाले होते. आधीच्या या 45 कोरोना रुग्णांपैकी नऊ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे, राज्यात कोरानापासून मुक्तता मिळालेले आधीचे सात धरून एकूण रुग्णांची संख्या 16 झाली आहे. राज्यात ‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्णांची संख्या 38 पर्यंत खाली आली असून आतापर्यंत एकू़ण बाधित रुग्णांची संख्या 54 झाली आहे.ही माहिती आरोग्य खात्याच्या सचिव निला मोहनन यांनी शुक्रवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मोहनन यांनी सांगितले,की महाराष्ट्रातून शुक्रवारी आलेले दोघेही जण वेगवेगळ्या वाहनातून राज्यात आले होते. हे दोघेही गोमंतकीय असून त्यांनी राज्यात प्रवेश करण्यासाठी रीतसर  अर्ज भरून परवाना मिळवला होता. गोमेकॉत 542 नमुने पाठवण्यात आले असून 513 जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह’आला आहे. अजूनही 27 अहवाल प्रलंबित आहेत. मडगावच्या कोविड इस्पितळातील रुग्णांची संख्या 38 असून विविध ठिकाणावरील विलगीकरण केंद्रात 873 लोकांना ठेवण्यात आले आहे.   माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय सिंग म्हणाले, की राज्यात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तीन रेल्वे उत्तर प्रदेशाला रवाना झाल्या असून या प्रत्येक रेलगाडीत 1628 मिळून एकूण 4884 प्रवाशी गेले आहेत. आणखी तीन रेल्वे उशिरा जाणार ाहेत. उत्तर प्रदेशातील लोकांची राज्यात संख्या मोठी असल्याने आणखीही रेल्वे सोडल्या जाणार आहेत. प्रत्येक नोंदणी केलेल्या कामगाराला जाणार्‍या रेल्वेची माहिती, स्थानक व वेळ कळवली जात असली तरी एकाचवेळी हजारोच्या संख्येने लोक स्थानकावर येत असल्याने काहीसा गोंधळ निर्माण होत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात उत्तर प्रदेशातील बहुसंख्य कामगार आपल्या राज्यात परत गेले असल्याने यापुढे गोंधळ कमी होणार आहे. 

राज्यातून शुक्रवारपर्यंत शुक्रवारपर्यंत 43794 प्रवाशी परराज्यात गेले असून अन्य राज्यातून 4075 प्रवाशी राज्यात दाखल झाले आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विविध गुन्ह्यासाठी 474 एफआयआरची नोंद करण्यात आली असून एकूण 404 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती संजय सिंग यांनी दिली.