Wed, Jul 17, 2019 18:19होमपेज › Goa › गोव्यात दोन नवे एज्युकेशन हब

गोव्यात दोन नवे एज्युकेशन हब

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 01 2018 11:59PMपणजी : प्रतिनिधी

आधुनिक जगात गोव्याची ओळख  ‘वैज्ञानिक केंद्र’, अशी व्हावी यासाठी सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केेले जाणार आहेत. राज्यातील विज्ञानविषयक शिक्षण आणि जिज्ञासेत वृध्दी व्हावी यासाठी दोन नवे ‘एज्युकेशन हब’ राज्यात स्थापन केले जाणार आहेत. यंदापासून नोबेल पुरस्कार विजेत्यांची व्याख्यानमाला दरवर्षी गोव्यात आयोजित केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घोषित केले. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित‘नोबेल प्राईज सिरीज’ चे  गुरूवारी कला अकादमीमध्ये दीनानाथ मंगेशकर सभागृहात पर्रीकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून ‘विज्ञान क्षेत्रात नावीण्यपूर्ण कल्पनां’साठी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतून विजेता निवडण्यासाठी  आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिकांना आमंत्रण दिले जाणार आहे. विजेत्यांच्या कल्पना  प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारकडून किमान एक वर्षासाठी आवश्यक ती  मदत दिली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने स्वीडनच्या नोबेल मिडिया, नोबेल म्युझियम व गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने ‘नोबेल प्राईज सिरीज’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर इंग्लंडचे 1993 सालचे फिजिओलॉजी/मेडिसीनचे नोबेल विजेते रिचर्ड रॉबर्टस्, जर्मनीचे 1995 सालचे फिजिओलॉजी/ मेडिसीनचे नोबेल विजेते ख्रिस्तीयान नुसेन वॉलहार्ड, फ्रान्सचे 2012 सालचे भौतिकशास्राचे नोबेल विजेते सर्ज हॅरोच, इंग्लंडचे 2015 सालचे रसायनशास्राचे नोबेल विजेते थॉमस लिंडाल, नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष कार्ल हेन्रिक हेल्दिन, भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी खात्याचे सचिव के. विजय राघवन,  नोबेल म्युझियमचे संचालक डॉ. ओलांव आमेलिन, स्वीडनच्या मुंबईतील कोन्सुल जनरल श्रीमती उलरिका सनबर्ग आदी मान्यवर हजर होते. 

‘नोबेल मिडीया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी  मॅथियश फायरेनियस यांनी उपस्थितांचे स्वागत तर विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव दौलत हवालदार यांनी आभार मानले. राज्यातील अनेक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच उद्योजक, विचारवंत, वैज्ञानिक आदींनी सभागृहात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 

विज्ञानाधारीत शिक्षणावर भर : मुख्यमंत्री

देशातील सर्वात लहान आणि निसर्गासाठी प्रसिद्धी लाभलेल्या गोव्यात पहिल्यांदाच ‘नोबेल प्राईज सिरीज’ आयोजित करणे हा गोमंतकीयांचा सन्मान आहे. या राज्याला विज्ञानाचा अलौकीक असा वारसा लाभला असून डी. डी. कोसंबी, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांसारखे महान वैज्ञानिक गोव्यातून देशाला अर्थात जगाला लाभले आहेत. गोव्याची ‘वैज्ञानिक हब’ म्हणून ओळख कायम रहावी यासाठी विज्ञानावर आधारीत शिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले.