Thu, Apr 25, 2019 16:00होमपेज › Goa › बसच्या धडकेत दोघे ठार

बसच्या धडकेत दोघे ठार

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMपणजी : प्रतिनिधी 

पणजी कदंब बसस्थानकावर  शनिवारी (दि. 17) सकाळी खासगी बसमधून उतरलेल्या प्रवाशांना अन्य एका खासगी बसने ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात शंकर ठाकूर (वय 51, कुर्टी-फोंडा) व  तुळशीदास भट (72, नार्वे-डिचोली)  हे दोन प्रवासी ठार झाले. तर प्रेरणा  भगत (25, माशेल), लवू वायंगणकर (54, दिवाडी) व विन्सेंट  ब्रागांझा (29, सांताकू्रझ) हे प्रवासी गंभीर जखमी झाले. बसचालक सलीम महंमद यास पोलिसांनी अटक केली आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. फोंड्याहून पणजीच्या दिशेने येणारी जीए 01 टी 8154 ही फोंडा-पणजी मार्गावरील खासगी बस प्रवाशांना घेऊन पणजी येथील कंदब बसस्थानक येथे उभी होती. प्रवासी बसमधून उतरत असतानाच पणजी-ताळगाव या मार्गावरील जीए 07 एफ 1972  या बसने बसस्थानकातून   बाहेर पडत मुख्य मार्गावर चुकीच्या  दिशेने जात बसमधून उतरलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली. शंकर ठाकूर, तुळशीदास भट,  प्रेरणा  भगत, लवू वायंगणकर व विन्सेंट ब्रागांझा या प्रवाशांना बसने चिरडले. यात हे सर्वजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सलिम महमद हा बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याला नंतर पोलिसांनी अटक केली.

अपघात  घडताच  एकच गोंधळ उडाला. बसस्थानकावर उपस्थित लोकांनी घटनेची माहिती त्वरित 108 रुग्णवाहिका तसेच पणजी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. सर्व जखमींना त्वरित उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात  दाखल करण्यात आले. मात्र,  उपचारादरम्यान शंकर ठाकूर व  तुळशीदास भट यांचा मृत्यू झाला. या दोघांचेही मृतदेह  त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.