Sat, Jun 06, 2020 06:34होमपेज › Goa › काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या संपर्कात

काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या संपर्कात

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 12 2018 1:26AMपणजी : प्रतिनिधी  

काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. 13 मे रोजी गोवा दौर्‍यावर येणार्‍या भाजप अध्यक्ष अमित शहा यांची ते भेटदेखील घेऊ शकतात, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत  सांगितले. भाजप युतीकडे बहुमत असल्यानेच युती सत्तेत आहे. सरकार अस्थिर नसून आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.राणे म्हणाले, सरकारमधील सर्व घटकपक्ष एकसंध आहेत. सरकार अस्थिर नसून उलट काँग्रेसमधील दोन ते तीन आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सदर आमदार हे  कनिष्ठ आमदार आहेत. 2019 साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीतदेखील  काँग्रेस काही बदल घडवू शकत नसल्याचे राणे यांनी सांगितले. 

या सर्वांमुळे काँग्रेस बैचेन झाले असून राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी करीत आहेत. सरकारकडे बहुमत असल्यानेच ते सत्तेत आहे. मात्र   असे असूनही काँग्रेसचे नेते सरकार स्थापन करण्यास राज्यपालांनी संधी द्यावी, अशी मागणी करीत आहेत. सदर मागणी कुठल्या आधारे ते करीत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे, असे त्यांनी म्हटले.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी विदेशात आहेत. मात्र ते नियमितपणे मंत्र्यांच्या संपर्कात असून विविध विषयांवर चर्चा करतात. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. सरकार योग्य पध्दतीने काम करीत असून  योजना तसेच अन्य सेवा जनतेला उलपब्ध होत आहेत.  काँग्रेस  विनाकारण मुख्यमंत्री बदला अशी मागणी करीत असल्याचेही  राणे म्हणाले.हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो म्हणाले की,  भाजप अध्यक्ष शहा यांच्या उपस्थितीत 13 मे रोजी  होणार्‍या  बूथ कार्यकर्ता मेळाव्यासाठी 1 हजार 642 बूथवरील सुमारे 16 हजार कार्यकर्ते सहभागी होतील. या संमेलनाला  कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद  लाभणार आहे. यावेळी वास्कोचे आमदार मिलिंद नाईक उपस्थित होते.

काँग्रेसचे सोळाही आमदार एकसंध : कवळेकर

काँग्रेसचे 2-3 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची अफवा पसरवली  जात आहे.  काँग्रेसचा कोणताही आमदार भाजपच्या संपर्कात नाही, भाजपने खोटा प्रचार चालवलेला आहे. अशी कोणतीही अफवा पसरवणार्‍या व्यक्‍तीचा भ्रमनिरास होणार आहे.  कदाचित भाजप आमदारच पक्ष सोडून जाण्याची भीती असल्याने अशा अफवा  पसरवल्या जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सर्व सोळाही आमदार एकत्र आणि एकसंध असून शहा यांना भेटण्याचे वृत्त खोटे असल्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.  

शहांची गोवा भेट आमदारांच्या  शॉपिंगसाठी? : चोडणकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, काँग्रेसचा आता कोणताही आमदार विक्रीसाठी उपलब्ध नाही. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष  शहा काँग्रेसच्या आमदारांना भेटणार असल्याचे आरोग्यमंत्री राणे जर सांगत आहेत, तर  शहा राज्यात संघटना बांधणीसाठी येत आहेत की आमदारांची शॉपिंग करण्यासाठी येत आहेत, असा आपला भाजपला प्रश्‍न आहे. शहा हे नेते म्हणून राज्यात येत आहेत, की ‘डिलर’ म्हणून याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही चोडणकर म्हणाले.