Thu, Feb 21, 2019 15:18होमपेज › Goa › वीस दुचाकी रुग्णवाहिका सेवेत दाखल

वीस दुचाकी रुग्णवाहिका सेवेत दाखल

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 09 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी

आरोग्य खात्याच्या ताफ्यात 20 दुचाकी रुग्णवाहिका सामील करण्यात आल्या असून गुरुवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पर्वरी येथील सचिवालयात झालेल्या कार्यक्रमात  त्यांचे लोकार्पण करण्यात आले. येत्या  वर्षभरात 100 दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत  करण्याचे उद्दिष्ट   सरकारने ठेवले आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी यावेळी सांगितले. 

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले,  किनारी भागांबरोबर वर्दळीच्या ठिकाणी या दुचाकी रुग्णवाहिका   तैनात  केल्या जाणार आहेत. आपत्कालीन स्थितीत रुग्णांपर्यंत या दुचाकी रुग्णवाहिकांना सहज पोहचून तातडीने प्राथमिक  उपचार करता येणार  आहे.  रुग्णवाहिकांना जसा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, तशी समस्या दुचाकी रुग्णवाहिकांना भासणार नाही. या दुचाकी रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, मास्क  आदी प्राथमिक उपचारासाठी लागणार्‍या सर्व सोयींचा समावेश करण्यात आला आहे.  चारचाकी रुग्णवाहिका  घटनास्थळी येऊन इस्पितळात नेईपर्यंत ही दुचाकी रुग्णवाहिका रुग्णाला प्राथमिक उपचार देण्याचे काम करेल. 

या दुचाकी रुग्णवाहिकांमुळे  रुग्णांना त्वरित उपचार मिळणार आहे.  व्यावसायिक   पॅरामेडिक्स या दुचाकी चालवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सहकार्यामुळे राज्यात दुचाकी रुग्णवाहिका सुरू करणे शक्य झाले आहे. किनारी भागांमध्ये त्यांची सेवा  मिळणार आहे. 25 दुचाकी रुग्णवाहिका  देण्याचा प्रस्ताव घेऊन एक खासगी कंपनी पुढे सरसावली आहे. येत्या वर्षभरात राज्यात अशा प्रकारच्या 100 दुचाकी रुग्णवाहिका सुरू केल्या जातील. या दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध करणारे कर्नाटकनंतरचे गोवा  हे देशातील दुसरे राज्य  ठरल्याचे  त्यांनी सांगितले.