Thu, Aug 22, 2019 14:35होमपेज › Goa › घोगळमध्ये डेंग्यूची बारा जणांना लागण

घोगळमध्ये डेंग्यूची बारा जणांना लागण

Published On: May 16 2019 2:04AM | Last Updated: May 16 2019 2:04AM
मडगाव : प्रतिनिधी 

मडगावच्या घोगळ येथील जलस्रोत खात्याच्या वसाहतीत डेंग्यूने थैमान घातले आहे. गेल्या आठवडाभरात एकूण बारा जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले असून त्यात  जलस्रोत खात्याच्या एका कर्मचार्‍याचा समावेश आहे. त्याच्यावर येथील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

घोगळ येथील जलस्रोत खात्याच्या वसाहतीत गेल्या आठ दिवसांपासून डेंग्युची साथ पसरली आहे. काहीजणांनी हॉस्पिसियो इस्पितळात उपचार घेतले असून  काहीजण खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. या वसाहतीला भेट दिली असता एकूण बारा जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे सांगण्यात आले. उघड्या असलेल्या सेप्टिक टँकमुळे डेंग्यूचा फैलाव झाला असावा, अशी शक्यता जलस्रोत खात्याच्या वसाहतीतील रहिवाशांनी व्यक्‍त केली आहे.

जलस्रोत खात्याचा कार्यालयात काम करणार्‍या एका महिलेला अचानक ताप आल्याने तिला आके भागातील एका प्रसिद्ध खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.तिच्या रक्ताचे नमुने घेतले असता तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले.तिला सात दिवस इस्पितळात भरती करून मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.तिच्या मागोमाग तिच्याच कार्यालयात काम करणार्‍या अन्य एक पुरुष कर्मचार्‍याला डेंग्यू झाल्याचे आढळून आले. सध्या त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

सविस्तर माहितीनुसार याच वसाहतीतील अन्य दहा जणांना डेंग्यूची लागण झाली होती.वरील दोघांना डेंग्यू झाल्याची माहिती शहरी आरोग्य केंद्राला देण्यात आल्यानंतर आरोग्य केंद्राकडून तातडीने या भागात औषधांची फवारणी करण्यात आली. संशयास्पद  स्थितीतील रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता डेंग्यू विषयी सकारात्मक अहवाल आला.डेंग्यूच्या बारा रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजू खरंगटे यांनी सांगितले.