Tue, Jun 25, 2019 15:55होमपेज › Goa › अनमोड-गोवा महामार्ग वाहतुकीस बंद

अनमोड-गोवा महामार्ग वाहतुकीस बंद

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:32AM
फोंडा : प्रतिनिधी

गोवा-बेळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा एक भाग म्हणून अनमोड ते गोवा सीमेपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी  शुक्रवारी  पूर्णपणे बंद करण्यात आला. रुंदीकरणासाठी अनमोड घाट बंद करण्यात येईल, असे यापूर्वी जाहीर करण्यात आले असले तरी मध्यंतरीच्या काळात पर्यायी मार्गाचा विचार सुरू असतानाच अचानकपणे शुक्रवारी दुपारी 12 वाजता मुख्य रस्ताच माती टाकून अडवला गेल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. वास्तविक रस्ता बंद करण्यापूर्वी आगाऊ कल्पना देणे आवश्यक होते, किंवा गोवा सीमेवर सूचना फलक उभारण्याची आवश्यकता होती, मात्र तसे काहीच न करता अचानक रस्ता बंद केल्याने वाहनचालकांना मोठा हेलपाटा पडला.

अनमोड  ते  गोवा सीमेपर्यंतचा सुमारे आठ किलोमीटरचा हा रस्ता रुंदीकरणासाठी पूर्णपणे बंद केला असून तीन महिन्यांत रुंदीकरण करून हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे कंत्राटदाराच्या प्रतिनिधीने पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेल्या 19 नोव्हेंबरला बेळगाव जिल्हाधिकार्‍यांनी खानापूर ते अनमोड गोवा सीमेपर्यंतचा रस्ता रुंदीकरणासाठी बंद करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, वाहतुकीची प्रचंड गैरसोय होणार असल्याने गोवा सीमेवरून खानापूर वन खात्याच्या अखत्यारितील रस्त्यावरून वाहतूक वळवण्याचे ठरवण्यात आले होते. सुरुवातीला खानापूरचा रस्ता बंद करून त्यानंतर अनमोड गोवा वेशीपर्यंतचा रस्ता बंद करण्यासंबंधीही 
चर्चा झाली होती. मात्र, पाच महिन्यांत पुन्हा पावसाळा असल्याने अनमोड ते गोवा सीमेपर्यंतचा रस्ता आधी करून वाहतूक खानापूरमार्गे वळवण्यासंबंधी कर्नाटक सरकारच्या परिवहन मंत्रालयाने ठरवले व त्यानुसार संबंधित कंत्राटदाराला सूचना करण्यात आली व आजच (शुक्रवारी) हा रस्ता बंद करण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे. 
सकाळी गोव्याहून मोले मार्गे बेळगाव, हुबळी तसेच अन्य ठिकाणी गेलेल्या कदंब महामंडळाच्या बसगाड्या तसेच इतर वाहनांना गोव्यात परतताना चोर्ला मार्ग गाठावा लागला. सद्यस्थितीत बेळगावहून गोव्याला येण्यासाठी चंदगड- आंबोली-सावंतवाडी महामार्ग, केरी -सत्तरी जांबोटी-चोर्ला मार्ग किंवा दांडेलीमार्गे होन्नावर-कारवारहून गोवा गाठावे लागणार आहे. अनमोड घाट बंद झाल्याने मोले, कुळे तसेच लगतच्या भागातील व्यवसायावर परिणाम होणार असून रोजीरोटीच बंद झाल्यात जमा असल्याच्या प्रतिक्रिया येथील व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत. 

वाहतूक तीन महिनेच बंद : सुदिन ढवळीकर

महामार्ग रुंदीकरण ही काळाची गरज आहे, त्याला पर्याय नाही. वाढत्या वाहतुकीसाठी हे रुंदीकरण आवश्यक असून बेळगाव-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. गोव्यातही बरेच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अनमोड-बेळगाव रस्ता रुंदीकरण गरजेचे ठरल्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. सुरुवातीला अनमोड ते गोवा वेशीपर्यंतचा सुमारे आठ किलोमीटरचा रस्ता तीन महिन्यांत रुंद केला जाणार असून तीन महिनेच या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. रुंदीकरणाचे हे काम जोरात सुरू असल्याने नियोजित वेळेतच हा रस्ता खुला होईल.

तीन महिने थांबा : कंत्राटदार

अनमोड ते रामनगरपर्यंतच्या आठ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही रुंदीकरणाचे काम करणारे ठेकेदार संतोष रेड्डी यांनी दिली आहे. गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक शक्य तेवढ्या लवकर सुरू करण्यासाठी कामाला वेग दिला जाईल, असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.