Wed, Apr 24, 2019 00:10होमपेज › Goa › गोमांस विक्री बंदमुळे कोटींची उलाढाल ठप्प

गोमांस विक्री बंदमुळे कोटींची उलाढाल ठप्प

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:23AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोवा मांस विक्रेते संघटनेने पुकारलेल्या गोमांस विक्री बंदच्या दुसर्‍या दिवशी रविवारी राज्यात मोठ्या प्रमाणात गोमांसाची टंचाई निर्माण झाली होती. राज्यात दोन दिवस गोमांस विक्रीची दुकाने बंद असल्याने सुमारे 1 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यासंबंधी तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.8) मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासह गोवा मांस विक्रेता संघटनेची बैठक होणार आहे. गोमांस वाहतूक करणार्‍या वाहन चालकांकडे कायदेशीर कागदपत्रे असतील, तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. या संदर्भात आपण पोलिस महासंचालकांनाही कळविले आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

परराज्यातून गोव्यात गोमांस आणणार्‍या वाहनांवर पोलिसांकडून होणार्‍या कारवाईमुळे विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने याचा निषेध म्हणून गोमांस विक्रेत्यांनी शनिवारपासून आपली दुकाने बंद ठेवली आहेत. सरकारने  या प्रश्‍नी तोडगा काढावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली असून तोडगा निघेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दरदिवशी गोमांसाची सुमारे 30 टन विक्री होते. यातील सुमारे 15 टन गोमांस विक्रेत्यांना आणि उर्वरित हॉटेल व्यावसायिक, कॅटरिंग सेवा देणार्‍या व्यावसायिकांना पुरविले जाते. कर्नाटकातून गोमांस मोठ्या प्रमाणात आणले जाते. बाजारपेठेत 250 रुपये किलो दराने गोमांसाची विक्री केली जाते. 

गोमांस विक्री व्यवसायासंदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, ती जाणून घेणे आवश्यक आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत कठोर भूमिका घ्यावी, असे नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.