Mon, Apr 22, 2019 04:22होमपेज › Goa › मराठी भाषेला अधिकृत दर्जासाठी प्रयत्न करावा 

मराठी भाषेला अधिकृत दर्जासाठी प्रयत्न करावा 

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 05 2017 1:48AM

बुकमार्क करा

वाळपई : प्रतिनिधी.

मराठी भाषा लोकांनी जगविलेली भाषा आहे. या भाषेच्या अस्तित्त्वाबाबत चिंता करण्याची गरज नाही. राजकीय वरदहस्तापेक्षा लोकांचा आशीर्वाद ज्या भाषेला आहे, ती भाषा अखंडीत राहणार आहे. गोव्यात मराठी भाषेला अधिकृतरित्या दर्जा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी राजकर्त्यांवर दबाव आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केले. बिंबल येथे साखळी बिल्वदल संस्थेच्या 5 व्या  मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कै. ह. मो. मराठे नगरीत महागणपती देवस्थान प्रांगणात संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र केरकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, साखळी बिल्वदल संस्थेचे अध्यक्ष सागर जावडेकर, उपाध्यक्ष म. कृ. पाटील, डॉ. राजेंद्र साखरदांडे, संमेलनाचे माजी अध्यक्ष विठ्ठल पारवडकर, संस्थेच्या सचिव अ‍ॅड. करूणा बाक्रे आदींची खास उपस्थिती होती.

डॉ. लवटे यांनी सांगितले की, मराठी भाषेच्या विकासासाठी या भाषेचा बोलीभाषेत वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत. लेखनात आणि वाचकांपर्यंतही मराठी भाषा पोहोचण्याची गरज आहे. संमेलनाच्या माध्यमातून भाषेची महती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संमेलन हे विचाराला घेवून जाणारी दिंडी आहे. गेल्या पन्नास वर्षांत 215 भाषा नष्ट झालेल्या आहेत. ही भाषा नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी कमी पडल्याने अशा समस्या निर्माण होत आहेत.भाषेचा वापर हा व्यावहारिकदृष्टीने होण्याची गरज आहे.

संमेलनाध्यक्ष राजेंद्र केरकर म्हणाले, मराठी भाषेच्या गोडव्याबाबत भीती बाळगण्याची गरज नाही. मराठी भाषेच्या अस्तित्त्वाच्या लढाया आपण अनेकवेळा लढलेल्या आहेत. मराठी भाषेची पताका कायमस्वरूपी फडकवण्यासाठी आपण संमेलनाच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठी भाषा व मराठी संस्कृतीच्या संरक्षणासाठी बहुजन समाजातील कष्टकरी मंडळींनी प्रयत्न केले आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. साहित्यिकांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून नवीन पिढीला रसभरीत साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातूनच साहित्याचा नंदादीप कायमस्वरूपी तेवत राहणार आहे.

अनुराधा म्हाळशेकर, तरूणा परब, स्नेहा जोशी, प्रज्वलिता गाडगीळ, अनघा गुणाजी, संजय पाटील, कोटीभास्कर, महेश नाईक यांनी  मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
प्रा.अनिल सामंत म्हणाले, मराठी भाषेच्या भविष्याबाबत कोणीही चिंता करण्याची गरज नाही. मराठी भाषेच्या विकासासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असून येणार्‍या काळात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी भाषिकांनी भाषा विकसित करण्यासाठी थोडा वेळ देण्याची गरज आहे. इतर संस्थेनी पुढाकार घेण्याची गरज आहे. संस्थेचे अध्यक्ष सागर जावडेकर यांनी सांगितले, की सत्तरीतील युवा वर्गाला साहित्य क्षेत्रात गोडी निर्माण व्हावी, यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.

सत्तरीतील  साहित्यिक पं. महादेव शास्त्री जोशी पुरस्कार प्रदान सोहळा झाला. यंदाचा पुरस्कार नाटककार विठ्ठल पारवडकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी विठ्ठल पारवडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

मानपत्राचे वाचन प्रज्वलिता गाडगीळ यांनी केले. सूत्रसंचालन राघोबा पेडणेकर यांनी केले. अ‍ॅड. करूणा बाक्रे यांनी आभार मानले. ‘सत्तरीतील तारे’ या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सचिव उपेंद्र जोशी, सी. ए. मिंलिंद राणे, कायदा सल्लागार अ‍ॅड. यशवंत गावस, प्रा. आदिती बर्वे, नाट्य कलाकार सूर्यकांत राणे आदींच्या मुलाखती झाल्या. अध्यक्षपद स्नेहा म्हांबरे यांनी सांभाळले.