होमपेज › Goa › ‘दीनदयाळ’अंतर्गत ‘टाटा’मध्ये  कॅन्सरवर उपचार : विश्‍वजीत राणे

‘दीनदयाळ’अंतर्गत ‘टाटा’मध्ये  कॅन्सरवर उपचार : विश्‍वजीत राणे

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 11:38PMपणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा’ योजनेअंतर्गत  कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईतील प्रसिद्ध टाटा मेमोरियल इस्पितळाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

राणे म्हणाले की, ‘दीनदयाळ’ योजनेखाली परराज्यातील काही नामांकित इस्पितळांचा समावेश करण्याचे आरोग्य खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोमंतकीय कॅन्सर रुग्णांसाठी टाटा मेमोरियल इस्पितळाचा सर्वात आधी ‘दीनदयाळ’ योजनेत समावेश करण्यात आला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे गोमंतकीय रूग्णांवर इतक्यात उपचार करण्याबाबत असमर्थता दर्शवून टाटा इस्पितळ प्रशासनाने थोडा वेळ मागितला आहे. यामुळे शेजारील राज्यातील आणखी काही इस्पितळांचा ‘दीनदयाळ’ योजनेत समावेश करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. 

दरम्यान, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) सुरक्षारक्षकांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करण्यापेक्षा कॅन्सरवर उपचार करण्यासाठी परराज्यात जाणार्‍या गोमंतकीय रुग्णांवर खर्च करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी रविवारी केली होती. 

सदर मागणी हास्यास्पद असल्याचे सांगून राणे म्हणाले की, गोमेकॉतील सुरक्षा ही फक्त रुग्णांसाठी नसून डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांसाठीही वाढवण्यात आली आहे. गोमेकॉ संकुलात  मुला- मुलींसाठीही वसतिगृहे असून त्यासाठी सुरक्षारक्षकांची अधिक भरती करण्यात आली आहे. गोमेकॉतील साधनसुविधा वाढल्याने सुरक्षाही त्याच परीने वाढवण्यात आली आहे.