होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरूच 

मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरूच 

Published On: Mar 01 2018 1:42AM | Last Updated: Mar 01 2018 12:24AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बुधवारी सलग चौथ्या दिवशीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सुरूच ठेवण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. राणे यांनी गोमेकॉतील डॉक्टरांशीही चर्चा केल्यानंतर सध्या त्यांना डिस्चार्ज न देण्याचे ठरविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गोमेकॉच्या सूत्रांनी मंगळवारी पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, हा निर्णय बुधवारी पुन्हा बदलण्यात आला असून यामागे  नेमके काय कारण आहे ? याबद्दल स्पष्टीकरण देण्यास कोणीही तयार नाही. मुख्यमंत्री पर्रीकर मागील चौदा दिवसांपासून आजारी आहेत. मुंबईतील लिलावती इस्पितळात 15फेब्रुवारीपासून ते सात दिवस होते. तिथे त्यांच्यावर स्वादूपिंडाशीसंबंधित आजारावर उपचार केले. त्यानंतर  अर्थसंकल्प मांडण्यासाठी ते गोव्यात दाखल झाले होते. मात्र, शनिवारी पर्रीकर यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने व त्यांचा रक्‍तदाब कमी झाल्याने त्यांना गोमेकॉत दाखल केले आहे.