Thu, Apr 25, 2019 07:47होमपेज › Goa › ‘आगोंद’ आशियातील अव्वल किनारा

‘आगोंद’ आशियातील अव्वल किनारा

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 12:14AMपणजी : प्रतिनिधी

दक्षिण गोव्यातील आगोंद किनार्‍याला वार्षिक ‘ट्रॅव्हलर्स चॉईस’ पुरस्काराच्या आशियाई यादीत पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. तीन किलोमीटर लांबीचा रुपेरी वाळूचा पट्टा लाभलेल्या या किनार्‍यावर कासव संवर्धन केंद्र असल्याने हा किनारा जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.

‘ट्रीप अ‍ॅडव्हायझर’ या पर्यटन साईटवरील बुकिंग्जवर आधारित ‘ट्रॅव्हलर्स चॉईस’ पुरस्कार दिला जातो. दक्षिण गोव्यातील अगदी टोकाचा तालुका असलेल्या काणकोणातील आगोंद बीच हा सौंदर्याने नटलेला किनारा असून, ‘ट्रॅव्हलर्स चॉईस’च्या जागतिक यादीत पहिल्या पंचवीस किनार्‍यांमध्ये त्याला स्थान मिळाले आहे.  या यादीत तो 18व्या स्थानावर  आहे. भारतातील उत्कृष्ट पंचवीस किनार्‍यांमध्ये आगोंदला पहिले स्थान प्राप्त झाले आहे.

‘ट्रॅव्हलर्स चॉईस’च्या आशियाई यादीत एकूण पाच भारतीय किनार्‍यांचा समावेश झाला आहे. या यादीत चौथ्या स्थानावर अंदमान व निकोबार बेटावरील ‘राधानगर बीच’ चे नाव आहे. गोव्यातील बाणावली, मांद्रे व पाळोळे हे समुद्रकिनारे अनुक्रमे 15, 18 व 20 व्या स्थानावर आहेत. 

तुर्क आणि कायकोस येथील ‘ग्रेस बे’ व ‘प्रोव्हिडेन्शियल्स’ हे किनारे जागतिक यादीत पहिल्या स्थानावर असून या पाठोपाठ ब्राझीलचे ‘बाय द सांचु’ व ‘फेर्नादो द नोरोन्हा’, क्युबाचा ‘वाराडेरो’ बीच, अरुबाचा ‘ईगल’ बीच व केमन बेटावरील ‘सेव्हन माईल’ बीच यांचा क्रमांक लागतो.

भारतीय किनार्‍यांची जागतिक नोंद : गंजू

आशियात आगोंद किनार्‍याला पहिले स्थान प्राप्त झाल्याने, जागतिक स्तरावर भारतीय किनार्‍यांची गंभीरतेने दखल घेतली जात आहे. हा किनारा जागतिक यादीतही समाविष्ट आहे. ही चांगली गोष्ट असून यामुळे भारतात येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढणार आहे, अशी आशा ‘ट्रीप अ‍ॅडव्हायझर’ इंडियाचे व्यवस्थापक निखिल गंजू यांनी व्यक्‍त केली.