Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Goa › कुठ्ठाळी जंक्शनवर वाहतुकीत सुधारणा

कुठ्ठाळी जंक्शनवर वाहतुकीत सुधारणा

Published On: Aug 20 2018 1:36AM | Last Updated: Aug 19 2018 11:46PMपणजी : प्रतिनिधी 

मडगाव-पणजी महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निर्देशांनुसार वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी योजलेल्या उपाययोजनांचा काहीअंशी लाभ झाला आहे. रस्त्यातील खड्डे बुजवणे, अतिरिक्‍त पोलिस नियुक्‍ती आणि वाहतुकीला लागलेल्या शिस्तीमुळे आता सुमारे 15 ते 20 मिनिटांचा उशीर होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. 

कुठ्ठाळी येथे मागील आठवडाभरापासून  होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना व नियमित प्रवास करणार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंबंधी विरोधी पक्ष काँग्रेसने तसेच अनेक नागरिक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार नोंदवल्याने पर्रीकर यांनी दखल घेत प्रशासकीय अधिकार्‍यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तातडीची उपाययोजना आखण्यास सांगितले होते. यामुळे शुक्रवारी मुख्य सचिव शर्मा, प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती, पोलिस महासंचालक मुक्‍तेश चंदर, पोलिस वाहतूक महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी वाहतूक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांसोबत कुठ्ठाळी जंक्शनला भेट देऊन अनेक सूचना केल्या. यातील काही सूचना प्रत्यक्ष अंमलात आणल्याने वाहतुकीत खूप फरक पडला आहे. 

कुठ्ठाळी जंक्शनवर पणजीहून मडगावच्या दिशेने जाणार्‍या वाहनांसाठी ‘स्लीप वे’तयार करण्याचे काम अजूनही हाती घेण्यात आलेले नाही. मात्र, पिलार-बायपास जंक्शनवरील आडवळणे कमी करण्यात आली आहेत. तसेच या भागातच पावसाचे पाणी साचून रस्त्यावर खड्डे पडत असल्याने त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. या सखल भागातील खड्डे ‘कोल्डमिक्स’चा वापर करून बुजवण्यात आले असल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. यामुळे वाहतूक कोंडी खूप अंशी कमी झाल्याचे  दिसून आले आहे. 

कुठ्ठाळी पुलाच्या दोन्ही बाजूने रविवारी वाहतूक पोलिसांची संख्या वाढलेली दिसून येत असली तरी आयआरबी जवान अजूनही कुठेही तैनात झाल्याचे आढळून आले नाहीत. वाहनांच्या रांगा मोडणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस जागोजागी उभे  आहेत. 

पणजीहून मडगावला जाणारी वाहतूक खूपच सुधारली असून वाटेत कुठेही फारसा वेळ थांबावे न लागता प्रवास होत असल्याचे अनेक प्रवाशांनी  सांगितले. मात्र उलट दिशेने, म्हणजे मडगावहून पणजीकडे येणारी वाहतूक काही ठिकाणी अजूनही अडखळत असल्याचे आढळून आले आहे. यात शनिवार-रविवार हे सुट्टीचे वार असल्याने वाहतूकही खूप कमी असल्याने कोंडी कमी झाली असण्याची शक्यता आहे. सरकारने तातडीने राबवलेल्या या उपायांमुळे वाहतूक कोंडी कमी झाली असून वाहने सुरळीत धावत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र वाहतुकीत केलेल्या सुधारणांचा खरा परिणाम, आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि.20) प्रत्यक्षात समजणार असल्याचे काही प्रवाशांनी  सोशल मीडियावर मत व्यक्त केले आहे.