Sat, Aug 24, 2019 23:52होमपेज › Goa › पर्यटकांनी किनारी भागात जाऊ नये

पर्यटकांनी किनारी भागात जाऊ नये

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:30AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील किनारी भागात  पावसाळ्याच्या दिवसांत गोव्यातील खवळलेल्या समुद्रात पर्यटकांनी आणि स्थानिकांनी जाऊ नये, यासाठी ‘अ‍ॅडवायझरी’ (मार्गदर्शक इशारावजा सूचना) जीवन सुरक्षा व्यवस्था पाहणार्‍या ‘दृष्टी मरिन’ संस्थेने  जारी  केली आहे. 

गोव्यात मागील आठ दिवसांत सात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. त्या पार्श्‍वभूमीवर ‘दृष्टी मरिन’ संस्थेने    प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की राज्यात किनारपट्टीवर   पर्यटकांचा बुडून  मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असल्याचे दु:ख वाटत आहे.  राज्यातील किनारपट्टीवर जाताना  दक्षता घ्यावी. विशेषतः  येत्या 30 सप्टेंबरपर्यंत   समुद्रात जाणे सर्वांनी टाळावे. भरतीचे प्रवाह एकमेकांना छेद जात असलेल्या ठिकाणी खडकाळ भाग, दगड वा रस्त्याच्या बाजूला जाऊ नये. या दिवसात समुद्रातील परिस्थिती अनाकलनीय असून   सध्या तासी 25 किलोमीटर  वेगाने वारे वाहत आहे. वादळी वारे तासी 45 किलोमीटर प्रति तासही वाहण्याचा धोका आहे.  किनार्‍यावर येणार्‍या लाटा 17 सेंकदात धडकत असून लाटांची उंची 2.9 मीटरपर्यंत जाऊ शकते. यामुळे किनार्‍याला भेट देणार्‍या व्यक्तींनी  लाटा धडकत असलेल्या जागेपासून किमान 100 मीटर अंतरात जाणे टाळावे. तसेच लाटा पोहचत नसलेल्या किनारी भागातही 15 सेंकदात पाणी पोहचू शकते, याचे भान ठेवावे. जीवरक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे  पर्यटकांच्या जीवावर बेतणारे असल्याने काळजी घेण्याचे आवाहन ‘दृष्टी मरिन ’ संस्थेने केले आहे.