Thu, Jun 20, 2019 00:28होमपेज › Goa › पर्यटनमंत्र्यांनीच दिली केंद्राला वारसास्थळांची माहिती

पर्यटनमंत्र्यांनीच दिली केंद्राला वारसास्थळांची माहिती

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:44AMपणजी : प्रतिनिधी

पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर आणि पुरातत्त्व खात्याच्या संचालिका बी. मदेरा यांनी स्वत: राज्यातील वारसास्थळांबाबतची माहिती केंद्र सरकारला कळवली आहे. तरीही  वारसास्थळे खासगी आस्थापनांना दत्तक देण्याबाबत केंद्र सरकारने राज्याला अंधारात ठेवल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे. हा  खोटेपणा असून त्याबद्दल पर्यटनमंत्री आजगावकर आणि पुरातत्त्वमंत्री विजय सरदेसाई यांनी गोमंतकीय जनतेची माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी  केली.

येथील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत चोडणकर म्हणाले की, पर्यटनमंत्री आजगावकर यांनी 29 मार्च 2018 रोजी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जी. आल्फोंस  यांना स्वत: सही करून पत्र पाठवले आहे. या पत्रात, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांचा विकास आणि देखभाल करण्याच्या ‘अपनी धरोहर, अपनी पेहचान’ या योजनेला राज्य सरकारकडून सहकार्य देण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच, यासंबंधी पर्यटन खात्याने राज्य  पुराभिलेख आणि पुरातत्व खात्याच्या मदतीने गोव्यातील  वारसास्थळांची केलेली यादी पत्रासोबत जोडण्यात  आल्याचे नमूद केले आहे.

राज्य पुरातत्व खात्याच्या संचालिका बी. मदेरा यांनी लिहीलेल्या यादीत काब दे राम किल्ला, मुरगाव किल्ला, सांगे येथील कातळशिल्प आणि खोर्जूवे किल्ला या चार वारसास्थळांची नावे केंद्र सरकारला कळवण्यात आली होती.  चोडणकर यांनी ही दोन्ही पत्रे पुराव्यादाखल पत्रकारांना सादर केली.  पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर आणि पुरातत्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांना सदर पत्रव्यवहाराबद्दल माहिती असूनही गोमंतकीय जनतेची दिशाभूल करण्यासाठी ते खोटेपणा करत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. 

याशिवाय केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जी. आल्फोंस यांनी लोकसभेत 19 मार्च 2018 रोजी अतारांकीत प्रश्‍नाला उत्तर देताना  सर्व राज्यांतील वारसास्थळे दत्तक घेण्याच्या योजनेची   माहिती लेखी स्वरुपात दिल्याचे चोडणकर यांनी सांगितले.  या यादीत गोव्यातील सहा वारसास्थळांची नावेही आहेत. केंद्रात भाजपप्रणित सरकार असूनही राज्यातील भाजप आघाडी सरकारातील घटक पक्षांच्या आमदारांना सदर गोष्ट माहिती नसेल, यावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी हे पुरावे पाहून आता दोन्ही घटक पक्षांच्या मंत्र्यांना सरकारातून काढून टाकणार की नाही, याचा खुलासा करावा, अशी मागणीही चोडणकर यांनी केली.