Sun, Aug 18, 2019 14:51होमपेज › Goa › राज्यात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता 

राज्यात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता 

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 08 2018 1:49AMपणजी : प्रतिनिधी

पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेली ‘सिस्टम’ हवामानात तयार होत नसल्याने राज्यात गेल्या दोन आठवड्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु, सध्या  बंगालचा उपसागर तसेच पश्‍चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीकडील  क्षेत्रात ‘वेल मार्क’ कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. ज्यामुळे राज्यात बुधवार व गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली. 

साहू म्हणाले, समुद्रात वार्‍याची गती वाढली असून हवामानात आर्द्रतादेखील जास्त प्रमाणात असल्याने राज्यात येत्या 2 ते 3 दिवसांत काही भागात चांगला पाऊस पडणार आहे. पाऊस पडण्यासाठी हवामानात मजबूत सिस्टम बनले नव्हते. ‘ऑफ शोअर ट्रफ’ व कमी दाबाचा पट्टादेखील तयार झाला नसल्याने गेले 15 दिवस पाऊस कमी प्रमाणात पडत होता. आता पुन्हा ‘वेल मार्क’ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने त्यामुळे पाऊस चांगला पडणार आहे.  पावसाची  कमी झालेली टक्केवारीही भरून निघेल, असेही साहू यांनी सांगितले.

वेधशाळेच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण सरासरी 75 इंच पावसाची नोंद झाली आहे.  पावसाच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत 15  इंचांची तूट असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी सांगे, वाळपई, मडगाव व केपे भागात पाऊस होता. राज्यातील कमाल तापमान 29.8  अंश सेल्सियस तर किमान 25.7 अंश सेल्सियस इतके आहे.