Fri, Apr 26, 2019 19:59होमपेज › Goa › जनतेचे प्रश्‍न जाणून घेणार : चेल्लाकुमार

जनतेचे प्रश्‍न जाणून घेणार : चेल्लाकुमार

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 23 2018 12:56AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील जनतेचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी  प्रदेश काँग्रेसतर्फे ‘नमन तुका गोंयकारा, जन गण मन’ या  यात्रेची सुरुवात पणजी येथील कदंब बसस्थानकावरून प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ए. चेल्लाकुमार यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आली. 

चेल्लाकुमार म्हणाले, काँग्रेसचे नेते जनतेशी संवाद साधण्यासाठी बस, रिक्षा, मोटारसायकल, टॅक्सी, फेरीबोट आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेणार आहेत. या यात्रेद्वारे जनतेचे सर्व प्रश्‍न संकलित करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी सरकारकडे केली जाणार असल्याचेही त्यांनी  सांगितले.

पणजी कदंब बसस्थानक येथील मारुती मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन या यात्रेची सुरवात काँग्रेसने केली. यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेस नेत्यांनी पणजी, म्हापसा, हळदोणे, मये व डिचोली येथे सार्वजनिक वाहतुकीव्दारे प्रवास करुन जनतेची गार्‍हाणी ऐकली. 

चेल्लाकुमार म्हणाले, ‘नमन तुका गोंयकारा, जन गण मन’ हा कार्यक्रम अत्यंत वेगळा असून यात थेट जनतेचे प्रश्‍न जाणून घेतले जातील. गोव्यात मागील सहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. मात्र, या सरकारला जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. बेरोजगारी, खाणबंदी आदी समस्या लोकांना भेडसावत आहेत. खाण व्यवसायावर मोठ्या संख्येने लोक अवलंबून आहेत. मात्र, हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारला व केंद्र सरकारला अपयश आले आहे. जनतेची सर्व गार्‍हाणी एकत्र करून ती सरकारपुढे मांडली जातील. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यास सरकारला अपयश आल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या यात्रेत काँग्रेसचे स्थानिक   आमदार  तसेच नेतेदेखील भाग घेतील. सदर यात्रा राज्यातील सर्व चाळीसही मतदारसंघांमध्ये जाणार असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर,  सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस, तिसवाडी गटाध्यक्ष  अमरनाथ पणजीकर, सिध्दनाथ बुयांव,  जनार्दन भंडारी  व अन्य नेते उपस्थित होते.

राज्यातील विकासकामे  रखडली : चोडणकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले,  सामान्यातल्या सामान्य व्यक्तीशी संपर्क साधून  या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेतल्या जाणार आहेत. जनतेसमोर आज असंख्य प्रश्‍न आ वासून  उभे आहेत. खाण व्यवसाय बंद झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील दोन महिन्यांपासून मंत्रिमंडळ बैठक न झाल्याने  विकासकामे  रखडली आहेत, या बाबी राज्याच्या विकासाला बाधक ठरत आहेत.