होमपेज › Goa › ‘जीटीडीसी’तर्फे आता तिरूपती दर्शन सहल 

‘जीटीडीसी’तर्फे आता तिरूपती दर्शन सहल 

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 11:40PMपणजी : प्रतिनिधी 

तिरुपती दर्शनासाठी उत्सुक असलेले स्थानिक गोवेकर आणि यात्रेकरूंना 2 जुलैपासून आरामात प्रवास करता येणार आहे. गोवा टुरिझम, गोवा पर्यटन विकास महामंडळाद्वारे (जीटीडीसी) प्रवाशांसाठी खास सुविधांचा समावेश असलेल्या पॅकेज टुर्सचे लाँच करत आहे.पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांच्या उपस्थितीत 2 जुलै रोजी तिरुपती बालाजी दर्शन सहल सेवा लाँच करण्यात येणार आहे.

जीटीडीसी सीबर्ड ट्रॅव्हल्सच्या सहकार्याने दैनंदिन बससेवेचे गोवा ते तिरुपती आणि परतीच्या मार्गावर दोन दिवस व तीन रात्रींचे पॅकेज पुरवणार आहे. पर्यटनमंत्री आजगावकर म्हणाले की गोवा टुरिझम, गोवा पर्यटन विकास महामंडळाद्वारे तिरुपती येथे खास पॅकेज सहल सुरू करीत असल्यामुळे गोवेकरांची सोय होणार आहे. या सेवेला  चांगले यश मिळेल.

नीलेश काब्राल म्हणाले की तिरुपतीला भेट देऊ इच्छिणाऱया स्थानिकांकडून खास सेवा सुरू करण्याची मागणी बऱयाच दिवसांपासून होती. जीटीडीसीने परवडणाऱया किमतीत सहल तयार केली आहे. ज्यामध्ये आरामदायी प्रवास, दर्शन, वास्तव्य आणि इतर सोयींचा समावेश आहे.

ही सेवा लाँच झाल्यानंतर मल्टी एक्सेल व्होल्व्हो एसी सेमी स्लीपर कोच सेवा म्हापसापासून सुरू होईल. आणि पुढील मार्गावर पणजी, वेर्णा, मडगाव, कुंकळ्ळी, काणकोण येथून प्रवाशी घेत बेंगळुरमार्गे तिरुपतीला प्रस्थान करेल. बेंगळुरू येथे 12 तासांचा थांबा असेल. ज्यामध्ये यात्रेकरूंना स्थळदर्शन करता येईल किंवा राहण्याच्या सोयीचा अतिरिक्त पैसे भरून लाभ घेता येईल. या पॅकेजमध्ये प्राधान्य सेवा मिळणार असून त्यात तिरुमला येथे बालाजी दर्शनासाठी खास प्रवेश, प्रसाद तसेच तिरुमला येथे जाण्यासाठी अलामेलू मंगपुरा येथे पद्मावती देवीचे दर्शन यांचा समावेश असेल.

चार हजार रुपये किंमतीच्या या प्रवासात एपीएसआरटीसीची तिरुपती ते तिरूमला लिंक कोच, गाईड आणि दर्शन तिकिटाचा समावेश असेल. यामध्ये एक मोफत नाश्ता आणि तिरुपती येथे दुपारच्या जेवणाचा समावेशही असेल.

तिरुपती पॅकेज टुरचे तपशील

म्हापसा येथून 6.30 वाजता प्रयाण. पणजी, वेर्णा, मडगाव, कुंकळ्ळी आणि काणकोण येथून प्रवासी घेणे. दुसऱया दिवशी सकाळी आठ वाजता बेंगळुरू येथे आगमन (पर्याय  12 तासांच्या थांब्यादरम्यान अतिरिक्त पैसे भरून सहल/ हॉटेलमध्ये राहण्याची सोय). 8.30 वाजता तिरुपतीसाठी प्रयाण होईल. दुसर्‍या दिवशी पहाटे 3.30 वाजता तिरुपती येथे आगमन, पद्मावती देवीच्या दर्शनासाठी प्रयाण. नाश्ता, भगवान बालाजी दर्शनासाठी तिरुमलासाठी प्रयाण. तिरुपतीला परत येणे, भोजन आणि हॉटेलवर परतणे. तिरुपतीवरून दुपारी तीन वाजता निघणे. बेंगळुरुमध्ये 8.30 वाजता आगमन, छोटी विश्रांती आणि रात्री 9.30 वाजता गोव्याकडे प्रयाण. दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता गोव्यात आगमन.