Tue, Jul 23, 2019 17:03होमपेज › Goa › थिएटर ऑलिम्पिकमध्ये गोव्यातील तीन नाटके

थिएटर ऑलिम्पिकमध्ये गोव्यातील तीन नाटके

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:12AMपणजी : प्रतिनिधी

दिल्ली येथील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या थिएटर ऑलिम्पिक महोत्सवात गोव्यातून तीन नाटके सादर होणार आहेत. या महोत्सवासाठी देशभरातून सुमारे 4 हजार नाटकांच्या प्रवेशिका दाखल झाल्या असून गोव्यातील तीन नाटकांची त्यात सादरीकरणासाठी निवड होणे ही अभिमानास्पद बाब आहे, असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.  सदर महोत्सव 18 फेब्रुवारी ते 8 एप्रिल 2018 या कालावधीत देशातील 17 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. ‘कला अकादमी-पणजी’च्या ‘रंगमेळ’गटाचे ‘ब्लड वेडिंग’कोकणी नाटक, ‘भार्गवी थिएटर्स-पर्वरी’ यांचे कोकणी तियात्र ‘ओळणी मीठ’, पणजीच्या ‘अभिव्यक्ती’ संस्थेचे    मराठी नाटक ‘स्वप्नवासवदत्त’या तीन नाटकांची निवड झाली आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.   

‘कला अकादमी-पणजी’च्या ‘रंगमेळ’गटाची 1992 साली स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत 47 नाटकांची निर्मिती करण्यात आली आहे. या गटातर्फे 2000 साली दोनवेळा, त्यानंतर 2002, 2003 आणि 2005 वर्षी अशी मिळून पाचवेळा भारत रंग महोत्सवात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. तसेच डब्लीन-आयर्लंड येथे सॅम्युएल बॅकेट थिएटरमध्ये 2012 साली आठवडाभर दोन नाट्यप्रयोग सादर केले असून ‘रंगमेळ’ गटाचे काम प्रशंसनीय असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले. 

दरम्यान, पेडणे येथील भगवती हायस्कूलच्या ‘शंभूराजे’ आणि वागळे हायस्कूल-मंगेशी यांचे ‘गोमंतमुक्ती गाथा’ या दोन महानाट्याचे खास प्रयोग गोव्यात येत्या 26 एप्रिलपासून साखळी, केपे, काणकोण, फोंडा, सांगे आदी ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. या प्रयोगात हजार कलाकार, भव्य दिव्य रंगमंच, प्रकाशयोजना, खरोखरचे घोडे- हत्ती आदींचा समावेश असेल. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रयोग मोफत असून सामान्य लोकांना माफक दराचे तिकीट लावले जाणार आहे. प्रत्येक प्रयोगाला 10 हजार रसिक प्रेक्षकांना बसण्याची आसन व्यवस्था केली जाणार असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले. 

‘कोसंबी’ महोत्सवात उत्तम वक्‍ते आणणार : गावडे

कला अकादमीत सध्या सुरू असलेल्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात पाचऐवजी चार महनीय  वक्‍ते दाखल झाले असले तरी व्याख्यानमालेचा दर्जा खालावलेला नाही. मात्र,  यंदाच्या व्याख्यानमालेला रसिकांकडून व खास करून शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून  लाभलेल्या अल्प प्रतिसादाबद्दल विचार केला जाणार आहे. वक्‍ते ठरवण्याचे काम एका खास समितीद्वारे केले जात असून पुढील वर्षी आणखी चांगले वक्‍ते आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे  मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.