Thu, Apr 25, 2019 13:26होमपेज › Goa › वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार

वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 05 2017 1:48AM

बुकमार्क करा

फोंडा/पेडणे/ काकोडा : वार्ताहर

तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तिघेजण ठार झाले. रविवारी एकाचा तर सोमवारी झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला

बेतोड्यात कारचालक ठार

फोंडा : बोणबाग-बेतोडा येथील बगल रस्त्यावर रविवारी सायंकाळी 7 वा. सुमारास स्विफ्ट कारला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अनिल राजाराम कुलकर्णी (वय 55, सिल्वानगर-फोंडा, मूळ रा.पुणे) या कारचालकाचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (जीए-07-ई-0284) ही स्विफ्ट कार घेऊन अनिल कुलकर्णी बोरीहून बगलरस्त्याने सिल्वानगर येथे जात होते. बोणबाग येथील वळणावर विरुद्ध दिशेने आलेल्या (केए-05-बी-2220) ट्रकची धडक कारला बसली. यात कारचालक गंभीर जखमी होऊन कारमध्ये अडकला. फोंडा अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी धाव घेऊन चालकाला बाहेर काढले. मात्र, इस्पितळात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी ट्रकचालक महांतेश पंपनवार (वय 30, धारवाड) याला अटक केली आहे. उपनिरीक्षक अरुण गावडे यांनी अपघाताचा पंचनामा केला.

वेळगेे-पेडणे अपघातात अल्पवयीन ठार

म्हापसा : पिळर्ण बार्देशहून पेडणे पत्रादेवी येथून फसीनो मोटारसायकल क्र. जीए-03-एके-0811 वरून लग्नाला जाऊन घरी परतत असताना दुचाकीस्वाराला रस्त्यावरून जाणार्‍या बैलाचे शिंग लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला साहिल वराडकर (15) हा अल्पवयीन मुलगा ठार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  दुचाकीचालकाचे नाव नंदन तोरसकर असून हा अपघात वेळगे येथे घडला. बैलाचे शिंग चालकाला लागले व त्याचा मोटारसायकलवरील ताबा गेल्याने रस्त्यावर कलंडली. दोघेही स्वार खाली पडले. त्यात साहिलच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गतप्राण झाला.

रुग्णवाहिकेतून दोघांनाही म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी साहिलला मृत घोषित केले. हवालदार मुकुंद परब यांनी निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला.

सावर्डे अपघातात युवक ठार

काकोडा ः गांधीनगर सावर्डे येथे ट्रक (जीए-09-एम-8592) व दुचाकी (केए-23-ए-9063) यांच्यामध्ये झालेल्या अपघातात नागेश मंगलदास काजुमळकर (27, रा. गुडेमळा, सावर्डे) यांचा मृत्यू झाला. दुपारी 3.30 ते 4 च्या दरम्यान नागेश आपल्या दुचाकीवरून सावर्डेच्या बाजूने जात होता. त्यावेळी विरुध्द दिशेने जाणार्‍या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने नागेश जबर जखमी झाला. त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. कुडचडे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रशांत देसाई अधिक तपास करत आहेत.