Sat, Nov 17, 2018 20:55होमपेज › Goa › राज्यात तीन दिवस वादळी पाऊस

राज्यात तीन दिवस वादळी पाऊस

Published On: May 29 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 11:22PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात रविवारी मध्यरात्री काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. केरळ व कर्नाटक समुद्रकिनारपट्टीवर  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत असून पुढील तीन दिवस रात्री उशिरा वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली. कर्नाटक, केरळ किनार्‍यावर जोरदार वारे वाहत असून अरबी समुद्र खवळलेला आहे. त्यामुळेे मच्छीमारांना कर्नाटक, केरळ व लक्षव्दीपकडील किनार्‍यावर येत्या 30 मे पर्यंत  समुद्रात  न उतरण्याचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. 

साखळी, केपे, सांगे, काणकोण भागात रविवारी मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे राज्यातील तापमानात काही अंशांनी घट झाली असून लोकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.  राज्यातील कमाल तापमान 33.7 अंश सेल्सियस तर किमान तापमान 28 अंश सेल्सियस इतके नोंद झाले आहे.  गेल्या 24 तासांत पणजीत सर्वाधिक 33 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.